नांदेड : महाराष्ट्रातील एका भामट्यानं सोशल माध्यमावर यूपीच्या जज तरुणीला आपण जज असल्याची खोटी बतावणी करत तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन जज तरुणीच्या घरी जात तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीनं लग्नाला नकार दिल्यानंतर त्यानं तिची सोशल माध्यमांवर बदनामी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता हिमांशू देवकते नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : नांदेडच्या देगलूर येथील हिमालय उर्फ हिमांशू देवकते या तरुणानं उत्तर प्रदेशातील एका जज तरुणीसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. तसंच आपण जज असल्याची खोटी थाप त्यानं मारली. त्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन तो थेट जज तरुणीच्या घरी पोहोचला आणि तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, तरुणीनं लग्नास नकार दिला. त्यानंतर संतप्त तरुणानं जज तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकत तिची बदनामी केली. तसंच वारंवार धमकी देऊन नंतर पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली. "तू माझी पत्नी म्हणून महाराष्ट्रात नाही आली, तर आणखी बदनामी करून तुझं जीवन संपवेल," अशा धमक्या त्यानं दिल्या.
आरोपीला अटक : अखेर जज तरुणीच्या तक्रारीवरुन 15 जानेवारीला आरोपी विरुद्ध मेरठ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तेथील पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, मेरठ पोलिसांनी देगलूर पोलिसांच्या मदतीनं देगलूर तालुक्यातील तमलुर येथून हिमालय उर्फ हिमांशू मारुती देवकते या आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करुन मेरठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून पुढील तपास उत्तर प्रदेश पोलीस करत असल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलीय.
हेही वाचा -