मुंबई Nana Shankarsheth Death Anniversary : मुंबई आज जागतिक कीर्तीचं शहर बनलं आहे. इथे जरा काही झालं तरी त्याची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. मग ते इथले राजकारण असू दे, समाजकारण असू दे किंवा या शहराची होणारी प्रगती. आज इथे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीपासून ते गोरगरिबांपर्यंत सर्वच लोक राहतात. आज मुंबईची ओळख ही एक स्वप्न नगरी अशी बनली आहे. आशिया खंडातील सर्वांत पहिली रेल्वे धावली ती याच शहरात. आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका देखील मुंबईच आहे; मात्र म्हणतात ना माणूस जसजसा प्रगती करतो तसा आपला इतिहास विसरायला लागतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे या मुंबईला प्रगतीपथावर आणण्यासाठी या मुंबईच्या विकासाचा ज्या व्यक्तीनं पाया रचला त्यालाच आपण विसरत चाललो आहोत आणि त्यांचं नाव आहे नाना शंकरशेठ. आज नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी. या निमित्ताने नानांच्या कार्याला दिलेला हा उजाळा.
पहिली ट्रेन सुरू करण्याचं श्रेय नानांनाच : मुंबईतील लोकल ट्रेन मुंबईकरांच्या प्रवासाचं मुख्य साधन बनली आहे. या लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी देखील म्हणतात. रोज साधारण 40 लाख प्रवासी या लोकलने प्रवास करतात. मुंबईत जागतिक दर्जाची शाळा, कॉलेजेस आहेत. या सर्व सेवा, सुविधा मुंबईकरांना देण्याचा विचार ज्या माणसाच्या मनातला ती व्यक्ती म्हणजे नाना शंकरशेठ. इथे रेल्वे सेवेचा वारंवार उल्लेख करण्याचं कारण म्हणजे, आशिया खंडातली सर्वांत पहिली रेल्वे बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे पर्यंत धावली. ही आशिया खंडातली पहिली ट्रेन सुरू करण्याचं श्रेय जातं ते नाना शंकरशेठ यांनाच.
नाना मुरबाडहून मुंबईत आले : नानांचं मूळ नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे; मात्र ते मुंबईकरांचे नाना झाले ते त्यांच्या कामामुळे. नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 सालचा. ठाण्यातल्या मुरबाड या गावात नानांचा जन्म झाला. नानांच्या आईचं नाव भवानीबाई होतं. नानांचे वडील त्या काळातले श्रीमंत व्यापारी असल्याची नोंद आढळते. म्हैसूर येथे 1799 मध्ये टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात जे युद्ध झालं या युद्धात नानांच्या वडिलांना अमाप संपत्ती मिळाल्याचा उल्लेख मराठी विश्वकोशात आढळतो. नानांच्या लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर काही वर्षांतच नानांचे वडील व्यापारानिमित्त मुरबाड येथून मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर काही दिवसात नानांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण घरची जबाबदारी नानांवर आली. ही जबाबदारी नानांनी समर्थपणे पार पाडली.
शिक्षणाचं आणि विशेषत: इंग्रजीचं महत्त्व जाणलं : नाना शंकरशेठ हे दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. त्या काळात मुंबईवर इंग्रजांचं राज्य होतं. साधारण दोनशे वर्षांपूर्वी नानांनी इंग्रजीचं महत्त्व जाणलं होतं. त्यामुळे त्यांनी इथल्या मुलांना संस्कृत आणि इंग्रजी भाषेतील शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्या काळात जातीभेद, वर्णभेद मोठ्या प्रमाणात पाळले जात होते. हे सर्व बंद करायचं असेल तर लोकांना जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं होतं आणि ते शिक्षणाशिवाय शक्य नाही हे नानांनी जाणलं होतं. त्यावेळी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलफिस्टन हे होते. या इंग्रज अधिकाऱ्यांशी नानांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नानांनी मुंबईत एक शिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन गव्हर्नर एलफिस्टन यांच्याकडे मांडला. यातूनच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. याच माध्यमातून नानांनी मुलींच्या शिक्षणासाठी देखील प्रयत्न केले.
रेल्वेमुळे मिळाली मुंबईच्या विकासाला गती : साधारण 1804 साली रेल्वेच्या वाफेच्या इंजिनचा शोध लागला. त्यानंतर साधारण 1825 मध्ये जगातील पहिली ट्रेन इंग्लंड येथे धावली. याची माहिती नानांना मिळाली. अशी ट्रेन आपल्याकडे देखील सुरू व्हायला हवी यासाठी नानांनी प्रयत्न केले. त्यासाठी नानांनी इंग्रज सरकारकडे पत्रव्यवहार केला. मुंबईत देखील इंग्लंड प्रमाणे रेल्वे सुरू करण्याची कल्पना नानांनी आपल्या मित्राला सांगितली. नानांचे हे मित्र म्हणजे जमशेदजी जीजीभाय. जमशेदजी यांनी देखील आपल्या मित्राला साथ दिली. मग या दोघांनी मिळून 1845 मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. नानांच्या या प्रयत्नाला यश आलं आणि इंग्रज सरकारने 1 ऑगस्ट 1849 रोजी दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची स्थापना केली. रेल्वे कमिटीत त्यावेळी फक्त दोनच भारतीयांची नावे होती. त्यातील एक म्हणजे जमशेदजी आणि दुसरे म्हणजे नाना शंकरशेठ. या अंतर्गत 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली ट्रेन मुंबईत धावली. या ट्रेनचा मार्ग होता बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे. हे 32 किलोमीटरचे अंतर त्यावेळी वाफेवरच्या इंजिनाने 52 मिनिटात गाठले होते. मुंबईत रेल्वे सुरू झाली आणि मुंबईच्या विकासाला गती मिळाली.
'या' शिक्षण संस्थांच्या उभारणीत नानांचा वाटा : नानांची दूरदृष्टी आणि संस्थात्मक कामांची जाण ही इंग्रज अधिकाऱ्यांच्या नजरेतून लपली नाही. त्यामुळे नानांची तत्कालीन इंग्रज गव्हर्नरचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचा नानांनी मुंबईच्या विकासासाठी आणि समाजसेवेसाठी पुरेपूर वापर करून घेतला. ज्या काळात मुलींना शिक्षणाची बंदी होती त्या काळात नानांनी मुलींसाठी मुंबईत शाळा सुरू केल्या. आजचं जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई विद्यापीठ, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टन इंडिया, जिओग्राफिकल सोसायटी या शिक्षण संस्थांच्या उभारणीत आणि स्थापनेत नानांचा मोठा वाटा आहे.
सतीप्रथेला होता नानांचा विरोध : नानांचं आणखी एक काम आपण काळाच्या ओघात विसरलो ते म्हणजे नानांनी केलेला सतीप्रथेला विरोध. इंग्रज सरकारने सतीप्रथा बंद केली. हे सर्वांनाच माहिती आहे; पण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जेव्हा सतीप्रथा बंदी कायदा मांडला गेला तेव्हा त्या अर्जावर दोनच भारतीयांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यातील एक म्हणजे राजा राममोहन रॉय आणि दुसरे म्हणजे नाना शंकरशेठ. देशातील सतीप्रथा बंद व्हावी यासाठी नानांनी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. अशा या विकास पुरुषाचे मुंबईत कुठेही स्मारक नाही, ही शोकांतिका आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई सेंट्रल या स्थानकाला नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याची मागणी केली असली तरी नानांचं कार्य त्याहून मोठं आहे. मुंबईच्या विकासात आणि देशाच्या सामाजिक चळवळीत मोठं योगदान देणाऱ्या या विकास पुरुषाचं 31 जुलै 1865 रोजी निधन झालं. नानांच्या या कार्याला आणि समाजसेवेला ETV भारतचे वंदन!