मुंबई - राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. खरं तर जागा वाटपावर एक-दोन दिवसात शिक्कामोर्तेब होणार असल्याचं बोललं जातंंय. दरम्यान, भाजपा आणि सत्ताधारी यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय. या भीतीमुळं ते रडीचा डाव खेळताहेत, मतदार यादीतून मतदारांची नावं वगळली जाताहेत, बदलली जाताहेत, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय. शुक्रवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी ते बोलत होते.
शिंदे-फडणवीसांचं षडयंत्र: पुढे बोलताना नाना पाटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय. मतदारानी चांगलं मतदान केलं आणि लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेला घडू नये, यासाठी राज्यातील अनेक मतदार यादीतून मतदारांची नावं वगळली जाताहेत. मुख्यतः लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ज्या ठिकाणी चांगली मत मिळालीत. त्या मतदारसंघातून मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळण्यात येताहेत. हे षडयंत्र सत्ताधारी विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रचले असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय. राज्य निवडणूक आयोग जाहीर करणारी यादी अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक असावी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी मतदार यादी जाहीर केली होती. ती अत्यंत किचकट आणि स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळं ते रडीचा डाव खेळताहेत, असं टीकास्त्र नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर डागलंय. मतदार यादीतील जो घोळ आहे, त्याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचंही पटोलेंनी यावेळी सांगितलंय.
योजनादूत रद्द करावेत: राज्यातील महायुती सरकारनं ज्या योजना आणल्यात आणि जी कामं केली, ती सांगण्यासाठी सरकारनं खासगीरीत्या 50 हजार योजनादूतांची नेमणूक केलीय. हे योजनादूत मतदारांना फोन करून माहिती सांगताहेत की, सरकारने चांगली कामं केलीत. आम्हाला मतदान करा हे योजनादूत सरकारी नाहीत, हे खासगी आहेत आणि यांना 50 हजार रुपये देऊन यांची नेमणूक केलीय. हे सरळ सरळ महायुतीचा प्रचार करताहेत. त्यामुळं आम्ही याबाबत ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन हे योजनादूत रद्द करावेत, अशी मागणी करणार असल्याचं नाना पटोले म्हणालेत. राज्यातील अनेक भागात मतदार यादीमध्ये घोळ आहेत. नाशिकमध्ये ही मी एक-दोन उदाहरणे पाहिलेत. माणूस राहतो एका ठिकाणी, त्याचा पत्ता दुसऱ्या ठिकाणी आहे. हा घोळ आहे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीच दूर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय.
मग टक्केवारी कशी वाढणार?: या पत्रकार परिषदेत एका महिलेचा व्हिडीओ दाखवण्यात आलाय. ही महिला सांगते की, मागच्या वेळेस आमचे मतदार यादीत नाव होते. पण आता मतदार यादीत नावच दिसत नाहीये. आमची नावं वगळण्यात आलेली आहेत. भारताबाहेरील देशांमध्ये 100 टक्के मतदान होते. पण भारतात 50 अन् 60 टक्के असं मतदान का होते. तर मतदार यादीत मतदारांचा नावांचा घोळ आहे. त्यामुळं मतदानाची टक्केवारी कमी होते. एकाच घरातील पाच व्यक्तींचे वेगवेगळ्या मतदार केंद्रावर नाव आहेत. एकाच घरातील पत्ता परंतु त्यांचे पाच ठिकाणी वेगवेगळे नाव असल्यामुळं तिकडे त्यांनी जाऊन मतदान करू नये, असाही राज्य निवडणूक आयोगाच्या डाव आहे की काय? अशी आम्हाला शंका येते, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. जर असा मतदार यादीत जर घोळ असेल तर मतदाराची टक्केवारी कशी वाढणार? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय. राज्यातील डीजी बदलावा, अशी मागणी केलीय. पण राज्य निवडणूक आयोगाने म्हटले की, डीजी बदलता येणार नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये डीजी बदलण्यात आलाय. मग महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि पश्चिम बंगालला वेगळा न्याय का? असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार असल्याची टीका यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलीय.
हेही वाचा :