नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाची धमकी देणारे ईमेल पाठवून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अखेर नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. जगदीश उईके असं आरोपीचं नाव असून तो दिल्लीतून नागपूरला आला असता त्याला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. "जगदिश उईके याला नागपूर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे," अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली आहे.
कोण आहे जगदीश उईके? : जगदीश उईके (वय 35) हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगावचा रहिवासी असल्याची माहिती पुढं आली आहे. मात्र, 2016 पासून तो गोंदिया सोडून गेला होता. त्यानं गोंदियामधील त्याचं घरही विकलं होतं. 2021 मध्ये त्याला एका वेगळ्या प्रकरणात पकडण्यात आलं होतं. तसंच दहशतवादावर त्यानं एक पुस्तकही लिहिलं असल्याची माहिती पोलीस तपासात पुढं आलीय. हे पुस्तक देखील वादग्रस्त ठरल्यानं तो पोलिसांच्या रडारवर आला होता. तसंच आरोपीनं नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला होता, असं देखील तपासात पुढं आलंय.
टेरर कोड डी कोड केला असल्याचा दावा : काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये अशाच आशयाचा ईमेल आला होता. या ईमेलमध्ये " मी एक टेरर कोड डी कोड केलाय", असा दावा करण्यात आला होता. तसंच पुढील पाच दिवसांमध्ये विविध रेल्वे स्टेशन आणि रेल्वे विभागाच्या परिसरामध्ये 30 पेक्षा जास्त स्फोट होतील, असंही या ईमेलमध्ये सांगण्यात आलं होतं.
दिल्ली, नागपूर आणि गोंदियात सुरू होता शोध : जगदीश उईके हा मूळचा गोंदियाचा असला तरी तो गोंदिया मधून बेपत्ता होता. विशेष म्हणजे जगदीश उईकेला 2021 मध्येही पोलिसांनी धमकीच्या ईमेल प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत जगदीश उईके मानसिक अस्थिर असल्याची बाब तपास यंत्रणांच्या लक्षात आली होती. सध्या जगदीश उईकेचं शेवटचं लोकेशन दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस दिल्ली, नागपूर आणि गोंदियामध्ये त्याचा शोध घेत होते. अखेर दिल्लीतून नागपूरला आला असता, त्याला ताब्यात घेण्यात आलं.
हेही वाचा -