नागपूर : चार भिंतीच्या आत महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय आणि अत्याचारासंदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारनं 'भरोसा सेल'ची स्थापना केली. या 'भरोसा सेल'मुळं आज हजारोंचे संसार पुन्हा नव्यानं सुरू झालेत. कामाच्या निमित्तानं सततची धावपळ आणि एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यानं नवरा-बायकोच्या नात्यामध्ये संशयाचे ढग दाटून येतात. त्यामुळं अगदी किरकोळ कारणांमुळं पत्नी पत्नीचं नातं विस्कटायला लागलंय. अशा दुरावलेल्या नात्यांमध्ये पुन्हा नव्यानं विश्वास आणि प्रेम निर्माण करण्याचं काम नागपूर शहर पोलीस दलातील 'भरोसा सेल' करतय. भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांच्या नेतृत्वात अनेक पीडितांच्या संसाराची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.
भरोसा सेलचं उद्दिष्ट : भरोसा कक्षामुळं दरवर्षी शेकडो कुटुंबं आपसातील वाद आणि मतभेद विसरून पुन्हा नव्यानं संसारात रमली आहेत. गेल्या तीन वर्षात भरोसा सेलकडं आलेल्या एकूण 8 हजार 815 तक्रारींपैकी 3 हजार 391 प्रकरणात समेट घडवून आणला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आकडा 40 टक्के असून येत्या काळात हे प्रमाण 50 टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांनी ठेवलय.
अनेकांच्या संसारात निर्माण झाला भरोसा : "2 हजार 297 प्रकरणात तक्रारकर्ते दाम्पत्य स्वतः भरोसा सेलकडं आली आहेत. तर 6 हजार 518 प्रकरणं पोलीस स्टेशन मार्फत भरोसा सेलला प्राप्त झाली आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये आम्ही समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रयत्न केल्यानंतर समेट झाला नाही तर गरजेनुसार त्या जोडप्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो", अशी माहिती पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दिली.
... कसा सोडवला गुंता : "दोन महिन्यांपूर्वी एक गुन्हेगार त्याच्या पत्नीला सोबत राहण्यासाठी त्रास देत होता. 13 वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो कारागृहात होता. त्यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती. दोन महिन्यांपूर्वी ज्यावेळी तो शिक्षा भोगून बाहेर आला तेव्हा त्याची मुलगी 13 वर्षांची झाली होती. त्यामुळं ती मुलगी वडिलांचा स्वीकार करत नव्हती. मात्र, त्या व्यक्तीनं सोबत राहण्याचा हट्ट धरला होता. हे प्रकरण ज्यावेळी भरोसा सेलकडं आलं त्यावेळी त्याला भविष्यात मुलीच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर त्या आरोपीनं पत्नी आणि मुलीपासून दूर राहण्यास सहमती दर्शवली", असं सीमा सुर्वे यांनी सांगितलं.
हेही वाचा -