नागपूर Nagpur Crime : शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात एका मोठ्या भावानं लहान भावाच्या गळ्यावर धारदार चाकूनं वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव गोखे असं मृत तरुणाचं नाव असून दिलीप गोखे असं मारेकरी भावाचं नाव आहे. हत्येची ही घटना रविवारी रात्री उशिरा घडल्यामुळं पोलिसांकडून अद्यापही सविस्तर माहिती उघड होणं बाकी आहे. दुसऱ्या घटनेत भावाच्या हत्येची सुपारी बहिणीनं दिल्याची अत्यंत खळबळजनक घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर भागात उघडकीस आली आहे.
दारूच्या व्यसनातून आई वडिलांसोबत वाद : मृतक गौरवला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे तो रोजचं दारू पिण्यासाठी आई वडिलांसोबत वाद घालत होता. रविवार रात्री देखील त्यानं दारू पिण्यासाठी आई वडिलांना मारहाण केल्यामुळं संतापलेल्या दिलीप गोखलेनं गौरवच्या गळ्यावर धारदार चाकूनं सपासप वार केल्यानं गौरवचा जागीचं मृत्यू झाला. तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून आरोपी दिलीप गोखेला अटक केली.
बहिणीनं दिली भावाच्या हत्येची सुपारी : भावाच्या हत्येची सुपारी चक्क बहिणीनं दिल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर भागात उघडकीस आली आहे. बहिणीच्या प्रेम संबंधाची माहिती मृतक तरुणाला लागल्यानंतर तो बहिणीला मारहाण करायचा. त्या रागातून तिनं दोन मित्रांच्या मदतीनं भावाची सुपारी देऊन काटाचं काढला आहे. रजत कैलास उघडे असं मृतकाचं नाव आहे. आभा कैलास उघडे असं सुपारी देणाऱ्या बहिणीचं नाव आहे. तर रजतला दारू पाजून त्याचा खून करण्यात आभाचा प्रियकर अतुल भमोडे आणि पप्पू शामलाल बुरडे यांचा समावेश होता.
असा झाला खुनाचा उलगडा : नागपूर जिल्ह्यातील रामटेक हद्दीतील खिंडसी तलावामध्ये 17 एप्रिलला एक 25 ते 30 वर्ष वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत रामटेक पोलिसांना आढळून आला. मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं असता त्या युवकाला मारहाण केल्यानंतर गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह हा खिंडसी तलावामध्ये फेकून दिल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानंतर रामटेक पोलिसांनी खूनाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा तपासात धक्कादायक माहिती पुढं आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून रामटेक पोलिसांची 5 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे 5 असे विविध तपास पथकं तयार करण्यात आले. अनोळखी युवकाच्या दोन्ही हातावर "RAJAT, R.K., मॉ aa" अश्या अक्षरांनी गोंदविलेले होते. तसेच हातावर काही ठिकाणी हार्ट आणि तिन स्टार अश्या चिन्हांचे टॅटू काढलेले दिसून आले. त्यामुळं ओळखचिन्हांच्या आधारे मृतकाची ओळख पटविण्यासाठी त्याचे शारीरिक वर्णनासह शोधपत्रिका तयार करुन वृत्तपत्रामध्ये माहिती प्रसारित करण्यात आली. सोशल मीडियाव्दारे माहिती व्हायरल करण्यात आली. नागपूर ग्रामीण जिल्हा, नागपूर शहर भागात तसेच भंडारा, गोंदीया, वर्धा, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेशच्या शिवनी, बालाघाट, जबलपूर, रिवा, कटनी, छिंदवाडा, पांढुर्णा आणि छत्तीसगढ येथील राजनांदगांव, डोंगरगांव, भिलाई, रायपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये जावून हरवलेल्या व्यक्तींच्या रेकॉर्डची तपासणी करुन मृतकाची ओळख पटविण्याचं काम सुरू केलं. तसेच तांत्रिकदृष्टया तपास सुरु करुन तपास पथकातील पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले.
बहीण आणि आईवर बळावला संशय : आशिर्वाद नगर, हुडकेश्वर नागपूर इथं राहणाऱ्या दिपाली उघडेचा मुलगा रजत कैलास उघडे काही दिवसांपासून बेपत्ता आहे, अशी माहिती नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या तपास पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकानं लगेचं रजतची आई आणि बहिणीला संपर्क साधला. त्यांनी रजतबाबत विचारपूस केली असता, रजत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मृत युवकाचे काही फोटो दाखविले असता मृतक हा त्यांचा मुलगा रजत असल्याची ओळख रजतची आई दिपाली उघडे आणि बहीण आभा यांनी पोलिसांना दिली. रजतच्या मृत्यूची बातमी कळल्यावर त्याची आई आणि बहीण यांची वागणूक, चेहऱ्यावरील हावभाव हे अतिशय सामान्य दिसून आल्यानं त्याचवेळी दोघी विषयी पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. रामटेक पोलिसांना आता रजतच्या मृत्यूमागं काहीतरी गूढ दडलं आहे, अशी खात्री वाटू लागली. पोलिसांनी रजतच्या जवळच्या मित्रांची माहिती काढून त्यांच्याकडं विचारपूस सुरु केली. तेव्हा पोलिसांना, रजत मागील 6 महिण्यापासून घरीच होता. दारु पिण्याच्या सवयीचा असल्यानं कामधंदा करीत नव्हता. दारुच्या नशेत असल्यावर तो घरच्यांना खूप त्रास देत होता. त्याच्या घरचे लोक त्याच्या त्रासाला खूप कंटाळलेले होते. त्यानंतर पोलिसांनी आभा आणि तिची आई यांच्याकडं रजतबाबत सखोल चौकशी केली त्यानंतर सत्य बाहेर आलं.
भावाच्या खुनाची सुपारी 5 हजारात : आभा पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसाचा आभावर संशय बळावला. त्यामुळं पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. मोबाईल फोन तपासून तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला, तेव्हा महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली. आभा हिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि भावाकडं तिच्या मुलासोबत राहात होती. तांडापेठ इथं राहणाऱ्या अतुल भामोडेसोबत आभाचे प्रेमसंबध असल्याची माहिती मिळाली. अतुल भमोडे याला विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता, त्यानं पोलिसांना सांगितलं की, "आभा रजत संदर्भात रोज तक्रार करायची. ती म्हणाली की आजच याचं काहीतरी कर, याला संपवून टाक." त्यानंतर अतुलनं मित्राच्या मदतीनं रजतला रामटेकला नेलं आणि दारू पाजून त्याचा खून केला, अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :