मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपतींसह पर्यटकांचंदेखील आकर्षण आहे. यात पर्यटकांचा सर्वाधिक कल मरिन ड्राईव्ह येथे भेट देण्यावर असतो. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेले हे ठिकाण आता पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलंय. इथे अगदी भर उन्हातदेखील पर्यटक दिसतात. तर तरुणांमध्ये नाईट आऊटचे हे एक आवडते ठिकाण आहे. आणखी एक लक्षवेधी गोष्ट आहे ती म्हणजे टेट्रापॉड. आता हे ब्रिटिशकालीन टेट्रापॉड बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, पुढील 100 वर्ष टिकतील, असे टेट्रापॉड लवकरच बसवले जातील, असे महापालिकेने म्हटलंय. पण या टेट्रापॉडचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? का बसवले हे टेट्रापॉड? चला जाणून घेऊ यात.
इथला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा : ब्रिटिश काळात मुंबईतील मरिन ड्राईव्ह 1920 च्या सुमारास बांधण्यात आलाय. मरिन ड्राईव्हच्या भव्य वळणावर बसवलेले सुंदर पथदिवे रात्रीच्या वेळी प्रज्वलित होतात, तेव्हा इथला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. म्हणून याला क्विन नेकलेस म्हणजेच राणीच्या गळ्यातील हार, असेही म्हणतात. रात्रीच्या वेळी उंच इमारतींमधून मरिन ड्राइव्हचा नजारा पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. तिथे बसण्यासाठी एक कठडा तयार करण्यात आलाय. कठड्याच्या खाली टेट्रापॉड्स ठेवण्यात आलेत. लोक त्यावर बसून आपला निवांत वेळ घालवतात आणि भरपूर फोटो काढतात.
वेगवान लाटांपासून संरक्षण करतात : महापालिकेच्या माहितीनुसार, हे टेट्रापॉड एका खास कारणासाठी तयार केले गेलेत. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मायानगरी मुंबईचे अरबी समुद्राच्या तीव्र आणि वेगवान लाटांपासून संरक्षण करणे आहे. जेव्हा भरतीच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर आदळतात, तेव्हा त्याची कंपने दूरवर पोहोचतात. या कंपनांमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत हे टेट्रापॉड समुद्र किनाऱ्यावर ठेवले जातात. हे टेट्रापॉड किनाऱ्याची धूप, प्राण्याचे प्रेशर कमी करणे आणि इतर गोष्टींपासून संरक्षण करतात.
टेट्रापॉड हा ग्रीक शब्द : याबाबत पालिकेने दिलेली अधिकची माहिती अशी की, टेट्रापॉड हा ग्रीक शब्द असून, त्याचा अर्थ 'चार पायांचा' असा आहे. ग्रीकमध्ये टेट्रा म्हणजे चार आणि पॉड म्हणजे पाय याचा म्हणून टेट्रापॉड हा शब्द तयार झालाय. म्हणून टेट्रापॉडला चार पाय असतात. याची रचना साधारण स्टार फिशप्रमाणे असते. मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर 1960 मध्ये पहिल्यांदा टेट्रापॉड बसवण्यात आलेत. त्यानंतर 1982 आणि 2002 दरम्यान बसवण्यात आलेल्या टेट्रापॉडचे आयुर्मान आता संपलंय. टेट्रापॉड प्रथम फ्रान्समध्ये वापरले गेले. मुंबईत बसवण्यात आलेले टेट्रापॉड फ्रान्सच्या टेट्रापॉडपासून प्रेरणा घेऊन बसवण्यात आलेत. या टेट्रापॉडचे वजन अंदाजे 2 ते 10 टनांपर्यंत असते.
टेट्रापॉड हे एम 20 प्रकारातील : आता सध्या स्थितीत मरिन ड्राईव्ह येथील टेट्रापॉड हे एम 20 प्रकारातील आहेत. एम 20 ही एक सिमेंट काँक्रिटचा प्रकार आहे. आता यांचे आयुर्मान संपल्याने पालिकेने इथे एम 40 प्रतीचे टेट्रापॉड्स बसवण्याचा निर्णय घेतलाय. हे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिलीय. सोबतच एम 40 या नव्या स्टेटस टेट्रापॉडचे आयुर्मान 100 वर्ष असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलाय. सोबतच हे टेट्रापॉड बसवण्याच्या कामात एकूण 43 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय.
हेही वाचा -