मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असतानाच मायानगरीत विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी थेट ही निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसेच्या विद्यार्थीसेनेनंदेखील सक्रिय सहभाग घेतला होता. मनसेच्या विद्यार्थी सेनेला काय प्रतिसाद मिळतो? हे देखील या निकालात स्पष्ट होईल. मात्र, मुख्य निवडणूक शिवसेना ठाकरे पक्षाची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात झाली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर कोणत्या पक्षाला विजय मिळेल, याकडं सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
फोर्ट येथील मुख्यालयात निकाल जाहीर होणार- मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज होणार आहे. मात्र, मतमोजणी आणि निकाल एकाच दिवशी जाहीर करू नये, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडेट युनियन या संघटनेनं केली होती. या विरोधात विद्यार्थी परिषदेनं उच्च न्यायालयातदेखील धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं मतमोजणी झाल्यावर लगेचच निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यानं सिनेट निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यानुसार आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील मुख्यालयात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहा जागांकरिता 55 टक्के मतदान- यादी मतदानाच्या आधी एक दिवस निवडणूक स्थगित केल्यानं न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला फटकारले होते. त्यानंतर लगेचच मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंगळवारी मतदान झाले. एकूण दहा जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच जागा आहेत. या राखीव जागांमध्ये एक अनुसूचित जाती, एक विमुक्त जाती व एक भटक्या जमाती तर बाकी तीन जागा महिलांकरिता राखीव ठेवलेल्या आहेत. दहा जागांसाठी 28 जणांनी अर्ज भरले होते. एकूण मतदानापैकी 55 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. एकूण सहा हजार विद्यार्थ्यांनी मतदान केले.
- महाराष्ट्रमध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील पहिली निवडणूक मुंबई विद्यापीठात होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण शैक्षणिक जगतासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.
हेही वाचा-