मुंबई Ganesh immersion security - अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त विसर्जनादिवशी तैनात करण्यात येणार आहे. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात गणपतीला निरोप देण्यात येईल. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून अलर्ट मोडवर राहणार आहेत.
विशेष पोलीस बंदोबस्त - गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त दर्जाचे 40 वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे 50 अधिकारी, त्याशिवाय 2900 पोलीस अधिकारी तसंच 20 हजार 500 पोलीस कर्मचारी असे सर्व मिळून 23 हजार 490 पोलीस कर्मचारी, अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था) यांनी दिली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनसह सीसीटीव्हीची नजर - गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लक्ष असेलच त्याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील यावर सतत लक्ष ठेवण्यात येईल. मिरवणुकीत महिला, लहान मुलांसोबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस दक्ष राहणार असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
स्वतः पोलीस आयुक्त राहणार उपस्थित - विसर्जनादरम्यान मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या सहित सर्व वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून परिस्थितीचा आढावा घेतील, परिस्थितीवर लक्ष ठेवतील. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मुंबई पोलीस विशेष सुरक्षा कवच पुरवणार आहेत.
मुख दर्शन व चरण स्पर्शाची रांग होणार बंद - लालबागच्या राजाचे विसर्जन देखील राजेशाही थाटात केले जाते. मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या विसर्जनासाठी उसळत असते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग १६ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ६ वाजता बंद करण्यात येणार आहे. तसंच मुख दर्शनाची रांग रात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे, असं मंडळातर्फे कळवण्यात आलं आहे.