मुंबई - राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलाय. पुढील आदेश येईपर्यंत फणसाळकर या पदाचा कार्यभार पाहणार आहेत.
तीन अधिकारी शर्यतीत : काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्या तात्काळ बदलीचे आदेश दिलेत. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेनुसार राज्यातील आयपीएस अधिकाऱ्याकडे रश्मी शुक्ला यांचा पदभार सोपविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आलाय. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सेवाज्येष्ठतेनुसार राज्यातील तीन अधिकाऱ्यांची नावे रश्मी शुक्ला यांच्या जागी नियुक्ती करण्यासाठी मागविली आहेत. मुख्य सचिव या संबंधात कुठल्या अधिकाऱ्यांची शिफारस करणार हे अजून समजलेलं नाही. परंतु सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीमध्ये संजय वर्मा (डीजी कायदा आणि तंत्रज्ञान), रितेश कुमार (डीजी होमगार्ड) आणि संजीव कुमार सिंघल ( डीजी एसीबी) हे तीन अधिकारी शर्यतीत असून, त्यांची पुष्टी अद्याप झालेली नाही.
विवेक फणसाळकर यांची ज्येष्ठता : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे अधिकारी असून, ते पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत आहेत. फणसाळकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण तसेच कल्याण महामंडळ, मुंबई व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम केलंय. याबरोबरच फणसाळकर यांनी पावणे दोन वर्ष ठाणे शहर पोलीस आयुक्त या पदावर ही काम पाहिलंय. अकोला, वर्धा आणि परभणीचे पोलीस अधीक्षक या पदावरही फणसाळकर यांनी काम पाहिलंय. ऐन निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला यांच्या जागी आता कुणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.
हेही वाचा