मुंबई Anant Radhika Wedding : अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेयर करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या 'एक्स' हँडलरचा शोध घेत कारवाई केली आहे. देश विघातक कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही, हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईतून सिद्ध झालं.
आरोपीला गुजरातमधून अटक : अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉम्बची धमकी देणारी संशयास्पद पोस्ट टाकणाऱ्या गुजरातमधील एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली. विरल शाह नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली होती. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या मनात येत आहे की, अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटून जाईल." या पोस्टनंतर, मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता आरोपीला गुजरातच्या वडोदरा येथून अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
धमकीमध्ये काय म्हटलंय? : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील @ffsfir या युजरनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या मनात हा विचार येत आहे की, अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटून जाईल." याच पोस्टची दखल घेत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्ब असल्याची पोस्ट पाहून एका युजरनं मुंबई पोलिसांना टॅग केलं. ही अफवा असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला होता. अखेरी ही पोस्ट करणाऱया एकाला गुजरातमधून अटक केली.
अनंत-राधिका विवाहबद्ध : अनंत आणि राधिका यांचा विवाहसोहळा 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये पार पडला. देशासह विदेशातील दिग्गज लोकं या विवाहसोहळ्याला हजर होते. या सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी क़डक सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. SPG, NSG तसंच मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळं अंबानी यांचा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडला.
हेही वाचा -