मुंबई Ajit Pawar : मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न निर्माण करण्यात आला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. " रस्त्यातील खड्डे ताबडतोब बुजवण्यात यावेत. दहा दिवसात या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करावी," असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
रस्त्याची कामे युद्धपातळीवर करा- अजित पवार : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीची कोंडी आणि सुधारणांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, रईस शेख यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या भुयारी मार्ग तसेच उड्डाणपुलांच्या कामामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. प्रवाशांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक आमदार आणि मंत्री यांनी तक्रारी केल्यानंतर अखेर आज झालेल्या बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली. या प्रवासाचा वेळ 8 ते 10 तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुपटीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. "महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढवून वेळेची बचत होऊ शकते. त्यामुळे याबाबतची कामे युद्धपातळीवर करावीत," असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
टोल वसुली थांबवा : " या महामार्गावरील कामाबाबत कंत्राटदाराकडून कुचराई होताना दिसत आहे. त्यामुळे खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावे. जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाही. महामार्गाची व्यवस्थित डागडुजी होईपर्यंत महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचा प्रस्ताव सादर करावा," असे निर्देशही अजित पवार यांनी दिले. "महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीनं तातडीने उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती देऊन येत्या दहा दिवसात उपाययोजना कराव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा," असंही पवार म्हणाले.
अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन : " मुंबई-नाशिक महामार्गावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी 40 स्थानाच्या क्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्त करता येईल. तसेच त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि 'एमएसआरडीसी'ने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्यास तशा उपाययोजना कराव्यात," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. "जर येत्या दहा दिवसात रस्त्यांची डागडूजी करून वाहतूक सुरळीत केली गेली नाही तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी," असे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा: