मुंबई : मेट्रो-3 चा पहिला टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोमवारपासून म्हणजेच आजपासून खुला झालाय. मुंबईत पहिल्यांदाच भुयारी मेट्रो सेवा उपलब्ध झाली असून, सकाळी 11 वाजल्यापासून सामान्य प्रवाशांसाठी ती कार्यान्वित करण्यात आलीय. भुयारी मेट्रोची शेवटची मेट्रो सेवा सोमवारी रात्री 22.30 पर्यंत चालणार असून, मंगळवारपासून ती पूर्ण क्षमतेने नियमित सेवेत समाविष्ट केली जाणार आहे. मेट्रोची नियमित सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 6.30 ते रात्री 22.30 पर्यंत चालणार आहे. तसेच दर रविवारी ही सेवा सकाळी 8.30 ते रात्री 22.30 वाजेपर्यंत चालेल.
भाडे आणि वेळापत्रक जाणून घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आरे ते बीकेसीदरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. 12.5 किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने आरे ते बीकेसी हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होत आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तास लागतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन 12.5 किमीच्या मार्गावर 10 स्थानके तयार करण्यात आलीत. ही भूमिगत मेट्रो बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) T1, सहार रोड, CSMIA T2, मरोळ नाका, अंधेरी, SEEPZ आणि आरे कॉलनी JVLR या स्थानकांवर थांबणार आहे. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 पर्यंत मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. तसेच दररोज 96 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. आरे ते बीकेसी दरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी अंतराप्रमाणे 10 ते 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मेट्रो 3 ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 दोन्हीला जोडलेली आहे. तसेच मरोळ नाका स्थानकावरील घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो लाईन 1 ला देखील जोडते.
मेट्रोच्या दररोज 96 फेऱ्या : या मार्गावर मेट्रो दररोज एकूण 96 फेऱ्या मारणार आहे. MMRCL अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ डब्यांची प्रत्येक ट्रेन 2,500 प्रवासी घेऊन जाणार आहे, तर दोन मेट्रो ट्रेनमधील अंतर हे 6.40 मिनिटे असणार आहे. सुरुवातीला प्रवाशांना क्यूआर कोड असलेली कागदी तिकिटे दिली जातील, त्यानंतर एनसीएमसी कार्ड हळूहळू सक्रिय केले जाणार असल्याचंही मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितलं.
27 पैकी 26 स्टेशन्स भूमिगत : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) त्याच्या बांधकामाचे काम पाहत आहेत. 23,136 कोटी रुपयांच्या या मेट्रो मार्गाच्या बांधकाम आराखड्याला 2018 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालंय. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, MMRCL ने पहिल्या टप्प्यात आरे-BKC मार्गावर 100 टक्के काम पूर्ण केले आहे. तसेच येथील लाइन आणि बोगद्याचे काम पूर्ण झालंय, तर मेट्रो स्टेशनचे बांधकाम 98.6 टक्के पूर्ण झालंय. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात दिवसाला जवळपास साडेसहा लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. मात्र, सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर दररोज 17 लाख प्रवासी प्रवास करण्याची क्षमता असेल. खरं तर मुंबईचा हा पहिला मेट्रो कॉरिडॉर आहे, ज्यामध्ये 27 पैकी 26 स्टेशन्स भूमिगत आहेत.
27 कोणती स्थानके? : मुंबई मेट्रो लाईन-3 मध्ये आरे कॉलनी, SEEPZ, MIDC, मरोळ नाका, CSMIA T2 (विमानतळ), सहार रोड, CSMIA T1, सांताक्रूझ, विद्यानगरी, शितलादेवी मंदिर, धारावी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य विज्ञान चौक यांचा समावेश आहे. तसेच म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट विधानभवन स्टेशनचा समावेश आहे.
आरे-बीकेसी भुयारी मेट्रोमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून, बीकेसी, एमआयडीसी, एअरपोर्टवर रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते
मेट्रो वनला मेट्रो 3 जोडलेली असल्याने बीकेसीवरून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रो 3 आणि पुढे मेट्रो वनने घाटकोपरला सहजपणे पोहोचणे शक्य होणार आहे.
- जीवन कांडूभौरी, प्रवासी
हेही वाचा -