मुंबई Mumbai Mega Block : रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी नसल्यानं अनेक भावंडं रविवारी सुट्टीच्या दिवशी रक्षाबंधन साजरं करण्याची शक्यता आहे. मात्र, आता रक्षाबंधनाच्या ओवाळणीला बहिणी आपल्या भावापर्यंत उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. कारण रविवारी रेल्वेनं मुंबईत उपनगरीत मेगाब्लॉक जाहीर केला असून, याचा फटका भावाची ओवाळणी करण्यासाठी जाणाऱ्या बहिणींना बसण्याची शक्यता आहे. विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभालीमुळे मध्यरेल्वेनं मेगाब्लॉकचा निर्णय घेतला आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसंच अनेक गाड्या वळवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेनं वेळापत्रक जाहीर केलाय, जेणेकरुन प्रवाशांचा त्रास टाळता येईल. त्यामुळे तुम्ही देखील रविवारीच रक्षाबंधन करण्याच्या विचारात असाल, तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
'या' गाड्या उशिरा : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ठाणे ते दिवा दरम्यानच्या 5 आणि 6 व्या मार्गावर सकाळी 10:50 ते दुपारी 03:20 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधित, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सुटणारी बदलापूर जलद लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी सुटणारी आसनगाव जलद लोकल, या दोन्ही अप आणि डाऊन लोकल ठाणे आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. नियोजित स्थानकांव्यतिरिक्त या गाड्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबणार आहेत. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानावर पोहोचतील.
'या' गाड्या रद्द : दुसरीकडं हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधित वाशी, बेलापूर, पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 11:16 ते दुपारी 4:47 वाजेपर्यंत आणि वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 10:48 ते दुपारी 4:43 वाजेपर्यंत सुटतील. पनवेल, बेलापूर, वाशी इथून सकाळी 9:53 ते दुपारी 3:20 पर्यंत आणि गोरेगाव, वांद्रे इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं येणाऱ्या सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
मेल एक्सप्रेस गाड्यांना फटका : दरम्यान, याचा फटका मेल एक्सप्रेस गाड्यांना देखील बसणार असून, आप मेल आणि एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
हेही वाचा