ठाणे : गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकलमधून पडून जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्यानं एका तरुणाला डब्यात शिरता आलं नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाजात दाटीवाटीनं उभे राहून प्रवास केला. मात्र, त्याचा तोल जाऊून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाला.
डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलनं मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार मुंब्रा खाडीजवळ असताना लोकलच्या दरवाजाला त्यानं धरलेला हात सटकून तो खाडीत पडला. मात्र, अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
तोल गेल्यानं तरुणीचा मृत्यू- सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या रिया श्यामजी राजगोर (२६) या तरुणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. नोकरीला जाण्यासाठी ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलनं वेग घेतल्यानं कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला. यावेळी ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती.
कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांवर कशामुळे प्रवाशांचे मृत्यू होतात?जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर आतील गर्दीचा भार येतो. तेव्हा प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणं कठीण होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नसल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद- ठाण्यातील लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण, डब्यातील गर्दीमुळे जागा मिळत नसल्यानं जीवाला धोका निर्माण होतो. लोकलची संख्या वाढवूनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्यानं रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दोन्ही प्रवाशांच्या मृत्यू प्रकरणाची डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-