मुंबई Lalbaugcha Raja News : गणेशोत्सवात भाविकांनी लालबागच्या राजाला कोट्यावधी रुपयांचे सोने-चांदी अर्पण केले. या दागिन्यांचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शनिवारी लिलाव करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची आणि वस्तूंची विक्री झाली आहे.
एका भाविकाने लिलावात १ किलो सोन्याची वीटदेखील ७५ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केली. तर सोने-चांदीच्या वेगवेगळ्या वस्तू गणेश भाविकांनी खरेदी केल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे. सोन्याचे नेकलेस आणि चांदीचे गणरायाचे मुकुट, मूषक , सोनसाखळ्या भाविकांनी लिलावात खरेदी केल्या आहेत. हा लिलाव आजदेखील गणेश मंडळाच्या मंडपात होणार आहे. लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी सोने-चांदीच्या वस्तूंबरोबरच लाकडी बॅट आणि दुचाकी वाहनदेखील अर्पण केलं आहे.
राजाच्या चरणी ५ कोटी ६५ लाख ९० हजार : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्वसात लाखो भाविकांनी गणरायांचं दर्शन घेतलं आहे. 'लालबागचा राजा'च्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दान रूपातील पैशाची मोजणी शनिवारी पूर्ण झाली. भाविकांनी ७ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत ५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपयांची संपत्ती राजाच्या चरणी अर्पण केले असल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी दिली. भावनकांनी ४ किलो १५१.३६० ग्रॅम सोनं आणि ६४ किलो ३२१ ग्रॅम चांदी लालबाग राजाला अर्पण केलं आहे.
दानाची ८ सप्टेंबरपासून मोजणी - लालबागचा राजाचे दर्शन घेण्याकरिता देश-विदेशातून भाविक येतात. तर बॉलीवुडमधील सेलिब्रिटीसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि उद्योगपती आवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. गणेश मंडळातील दान पेट्यांमध्ये भाविकांनी स्वेच्छेनं अर्पण केलेल्या दानाची ८ सप्टेंबरपासून मोजणी सुरू होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या दान मतमोजणीत सहभागी झाले होती. मुंबईसह राज्यात दहा दिवसांच्या गणपतीचे १७ सप्टेंबरला विसर्जन करण्यात आले. हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्यानं हायड्रोलिक तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं.