मुंबई MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं 10 जून रोजी निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर 23 जुलैला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता चुरस निर्माण झाली आहे. कारण एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक, आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या रिंगणात उतरले आहेत.
सचिव अजिंक्य नाईक शर्यतीत : गेली अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबत काम करत असलेले आणि सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव असलेले अजिंक्य नाईक हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. सचिव म्हणून निवडून देताना अजिंक्य नाईक यांना 286 इतकी विक्रमी मतं मिळाली होती. त्यांना वरिष्ठ क्रिकेटपटू आणि क्लबच्या सचिवांनीसुद्धा पाठिंबा दिला होता. त्यामुळं या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचं पारडं जड मानलं जातय.
विहंग सरनाईक यांनी भरला अर्ज : दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव आणि मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनीही आता मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. विहंग सरनाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं आता अधिक चुरस निर्माण होणार आहे.
नाना पटोले यांनी भरला अर्ज : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजगाव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अर्ज दाखल केला आहे. एमसीएच्या अध्यक्ष पदासाठी नाना पटोले हे रिंगणात उतरले असून आपल्याला पुरेसं संख्याबळ आहे आणि आपल्याला क्रिकेट क्षेत्रातही यापूर्वीपासून आवड आहे, त्यामुळं आपण या निवडणुकीत उतरलो आहोत आणि निश्चित विजयी होऊ असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
कशी असणार निवडणूक प्रक्रिया : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ज्यांची नावं प्रस्तावित आणि मंजूर करण्यात आली आहेत, त्यांचा यात समावेश असेल. याच दिवशी वैध उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. तर 16 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून 23 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येईल.
हेही वाचा :