मुंबई Mulund Hit And Run : मुलुंड परिसरातील डम्पिंग ग्राउंड रोड येथे सोमवारी सकाळी एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात एकूण चारजण जखमी झाले आहेत. त्यातील रिक्षा चालकाची प्रकृती स्थिर असून मल्टिपल फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी : ऑडी चालक भरधाव वेगात मुलुंड डम्पिंग रोड मार्गावरून जात असताना त्याचा ऑडी कारवरील ताबा सुटला. त्यानंतर त्याने दोन रिक्षांना जबर धडक दिली. त्यातील एका रिक्षात दोन प्रवासी होते. त्यांच्यासह दोन्ही रिक्षा चालकही जखमी झाले असून एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर होती. जखमींना अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात दोन्ही रिक्षांचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी झाले आहेत. एक रेल्वे कर्मचारी तर दुसरा बेस्ट खात्यात काम करणारा कर्मचारी रिक्षातून प्रवास करत होते. यामध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? : पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितलं की, आरोपी कार चालक विजय गोरे (वय ४३) याला त्याच्या बहिणीच्या कांजूर मार्ग येथील घरून अटक करण्यात आली आहे. आरोपीची मेडिकल करून रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाला देखील दारूचा वास येत असल्यानं डॉक्टरांनी सांगितलं. ड्रंक अँड ड्राईव्हचे कलम देखील या गुन्ह्यात वाढवण्यात आले आहे. पुढील तपास मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे.
दोन रिक्षांना समोरून दिली धडक : विजय दत्तात्रय गोरे (वय ४३) असे अपघाताप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑडी चालकाचे नाव आहे. विजय कांजूरमार्ग पश्चिम येथील रूनवाल फॉरेस्ट या ठिकाणी पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहे. विजय हा एका आयटी कंपनीत नोकरीला असून तो 'वर्क फॉर्म होम' काम करतो. रविवारी रात्री विजयने भांडुपच्या एका बारमध्ये मद्यपान केले, त्यानंतर तो स्वतःची ऑडी मोटार (एमएच- ०१ -बीके-०११९) स्वतः चालवत ठाण्याला गेला. त्या ठिकाणी मित्रांसोबत मद्यपान केल्यानंतर त्याचे काही मित्र आणि विजय कर्जतला गेले. रात्रभर मौजमजा केल्यानंतर सोमवारी पहाटे ६ वाजता विजय हा ठाण्यात आला. त्या ठिकाणी त्याने मित्रांना सोडून मुंबईच्या दिशेने जाताना मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड येथे भरधाव वेगात असलेल्या ऑडीने प्रवाशी घेऊन मुलुंड स्थानकाकडे निघालेल्या दोन रिक्षांना समोरून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, दोन्ही रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या विजयने मोटार तेथेच सोडून पळून गेला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मुलुंड पोलीसांना कळवून जखमींना रिक्षातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
चारजण जखमी : घटनास्थळी आलेल्या मुलुंड पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून ऑडीकार आणि अपघातग्रस्त रिक्षा ताब्यात घेऊन मुलुंड पोलीस ठाण्यात आणले. या अपघातात दोन रिक्षाचालकासह एक रेल्वे कर्मचारी आणि बेस्टमध्ये काम करणारे दोघे असे चारजण जखमी झाले आहे. प्रकाश जाधव (वय ४६) राहणार शिवाजी नगर, ठाणे, हणमंत चव्हाण (वय ५७) राहणार मुलुंड पश्चिम, संतोष वालेकर (वय ४९) आणि विवेक जयस्वाल (वय २६) वालेकर आणि जयस्वाल हे दोघे रिक्षा चालक असून इतर दोघे रिक्षातील प्रवाशी आहे. मुलुंड पोलिसांनी ताबडतोब या अपघातातील चालकाचा शोध सुरू केला असता पोलिसांना ऑडी या कारमध्ये एक मोबाईल फोन मिळून आला. या मोबाईल फोनच्या आधारे पोलिसांनी ऑडी चालक विजय गोरे याला कांजूरमार्ग पूर्व येथुन बहिणीच्या घरातून अटक केली.
ऑडी चालकाने केले होते मद्यपान : पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विजय गोरे याच्या तो तोंडाला दारूचा वास येत होता अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. या प्रकरणी विजय गोरे विरुद्ध सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडी चालकाने मद्यपान केलं होतं अशी माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
आरोपी गेला पळून : आज सकाळी एक ऑडी गाडीच्या चालकाने कार भरधाव वेगाने चालवून डंपिंगरोड या ठिकाणी एका रिक्षास समोरुन ठोकर मारली. ती रिक्षा दुसऱ्या रिक्षावर आदळल्याने दोन्ही रिक्षाचे चालक आणि आतील दोन प्रवासी जखमी होण्यास कारणीभूत ठरले. मात्र, कोणतीही वैद्यकीय मदत न देता आरोपी पळून गेला म्हणून प्रकाश जाधव या प्रवाशाची तक्रार नोंदवून मुलुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ) (ब) सह मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहला न्यायालयीन कोठडी - Worli Hit and Run Case
- वरळी हिट अँड रन प्रकरण: अपघातग्रस्त वाहनावर याआधी झाली होती दंडात्मक कारवाई - Worli Hit And Run Case
- वरळी हिट अँड रन प्रकरण; आरोपी मिहीर शाहाचा वाहन परवाना होणार रद्द, पोलीस आरटीओला लिहिणार पत्र - Worli Hit And Run Case