पुणे Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ची घोषणा केली. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार असल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. असं असताना अजूनही या योजनेसाठी महिलांना अर्ज भरता येत नाहीय. शासनाकडून अजूनही यासाठी वेबसाईटदेखील तयार झाली नाही. अंगणवाडी सेवकांकडून फक्त अर्ज जमा करून घेण्यात येत आहे. शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात न आल्यानं या योजनेचा अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे.
महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र अजूनही यासाठी अर्ज कुठे करावा, अर्ज कसा करावा याची माहिती न दिल्यानं महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अर्ज करण्याची मुदत वाढवली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. याआधी 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती.
काय आहे वस्तुस्थिती ? : याबाबत ई-सेवा केंद्र येथे माहिती घेतली असता ते म्हणाले की, "शासनानं ही योजना जाहीर केली. 1 जुलै ते 14 जुलै पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र अजूनही कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावं हे सांगितलेलं नसल्यानं मोठी गैरसोय होत आहे. महिला आमच्या इथं योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येत आहेत. आम्ही त्यांना उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवाशी दाखला काढण्यासाठी सांगत आहे. महिलांनी लवकरात लवकर रहिवासी दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला काढावा, यासाठी आम्ही त्यांना माहिती देत आहोत. कारण हे दोन्ही दाखले काढण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा दिवस लागतात. जर हे दाखलेच काढले नाही तर या योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीयं. यामुळं जोपर्यंत शासनाकडून अर्ज भरण्यासाठी अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत महिलांनी हे दोन दाखले काढून घ्यावेत, असं आम्ही सांगत आहोत."
कोणाला घेता येणार योजनेचा लाभ ? : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेकरिता महिलांसाठी 21 ते 65 वर्षाची अट आहे. वार्षिक उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी त्यांना या योजनेअंर्तगत 1500 रुपये प्रति माह दिले जाणार आहे. तसेच लाभार्थी महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच लाभार्थ्यांचं बँक खातंदेखील असणं आवश्यक आहे.
कोणत्या महिला अपात्र असतील ? : कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल तरदेखील लाभ मिळू शकणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तसेच इतर योजनेतून लाभ घेणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, अशा लोकांना याचा लाभ घेता येणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ? : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अडीच लाखा पेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं, योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो एवढी कागदपत्रे असणे गरजेचं आहे. मग योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावं लागणार आहे. मग हे अर्ज अंगणवाडीत जमा करावं लागणार आहे.
हेही वाचा
- महिलांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ...डोमिसाइलचीही गरज नाही - अजित पवार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
- मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : दुधाला मिळणार 35 रुपयांचा भाव, विखे पाटीलांची विधानसभेत घोषणा - milk price Increase