पुणे- स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अखेर झुकलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं 25 ऑगस्ट रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination) पुढे ढकलली आहे. मात्र, इतर मागण्या पूर्ण न झाल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- राज्य लोकसेवा आयोगानं 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात परीक्षेची नवीन तारीख जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. ही माहिती लोकसेवा आयोगानं एक्स मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
पुण्यात शास्त्री रोड येथे आंदोलन सुरू- एमपीएससीच्या प्राथमिक परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेचीदेखील तयारी करत असतात. 25 ऑगस्टलाच लिपिक पदांसाठीच्या इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) परीक्षा होणार आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यात शास्त्री रोड येथे आंदोलन सुरू ठेवले. मागणी मान्य करूनही विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाहीत. कृषी विभागातील 258 पदांचाही एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत समावेश करावा, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासह इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं एका विद्यार्थ्यानं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सांगावं की, पुढील दहा दिवसात या संदर्भातील जाहिरात आम्ही काढणार आहोत. तसेच या संदर्भात आयोगानं स्पष्टीकरण द्यावे-आमदार रोहित पवार
ती मुदत आम्हाला मान्य नाही-रोहित पवार- विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत पाठिंबा दिला. ते रात्रभर मुलांच्या बरोबरच आंदोलनाला बसले आहे. त्यांच्याबरोबर रोहित पवार यांनीदेखील उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले," राज्य लोकसेवा आयोगानं परिपत्रक काढलेलं आहे. त्यात चार महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. ती मुदत आम्हाला मान्य नाही. ती मुदत एक ते दीड महिनापर्यंत देण्यात यावी. तसेच परीक्षा कधी घेण्यात येणार आहे, त्याची तारीखदेखील सांगण्यात आलेली नाही."
काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांचे आंदोलन सुरू- संयुक्त पुर्व परिक्षेच्या गट ब आणि गट कच्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. आता दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रुपाली पाटील आणि भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. संयुक्त पूर्व परिक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील, असं आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिलंय. त्याचबरोबर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीदेखील विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. या तिसऱ्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार, अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी आणि रुपाली पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, जोपर्यंत तिसरी संयुक्त पूर्व परिक्षेची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतलाय.
हेही वाचा-