मुंबई : MNS support to Modi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करताना आपल्याला जागा वाटपामध्ये कधीच रस नव्हता. (MNS chief Raj Thackeray) तसंच, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाला देशाच्या विकासासाठी पाठिंबा द्यायला पाहिजे असं आपलं स्वतःचं मत असून त्यासाठी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांची ही अपेक्षित भूमिका होती असं विरोधकांचं म्हणणं असून त्यांनी बिनशर्त पाठिंबा न देता शरणागती पत्करली आहे का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
ही वॉशिंग मशीन मध्ये शरणागती का : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यातील एका पक्षाचे आता नमो निर्माण झाले आहे का? प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू असलेले नेते एका व्यभिचारी पक्षाच्या व्यासपीठावर जातात याचा अर्थ काय? जो पक्ष ईडी आणि सीबीआय यांचा धाक दाखवून अनेकांना पक्षात सामावून घेतो तसं काही झालं आहे का? याचं उत्तर त्यांना जनतेला द्यावं लागेल. हसन मुश्रीफ, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी बिनशर्त दिलेला पाठिंबा कशासाठी दिला आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तसं काही झालं आहे का? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. भाजपाने त्यांना एखादी फाईल दाखवली आहे का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, हा बिनशर्त पाठिंबा नाही तर वॉशिंग मशीनमध्ये पत्करलेली शरणागती आहे का? हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं असंही राऊत म्हणाले आहेत.
महायुती अधिक बळकट झाली : मनसे नेते राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांच्यामागे महाराष्ट्रातील शेकडो तरुण आहेत. त्यांच्या विचारावर विश्वास असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना दिलेला पाठिंबा आणि महायुतीला दिलेलं बळ याचं आपण स्वागतच करतो. यामुळे महायुती अधिक बळकट झाली असून, याचा आगामी निवडणुकांमध्ये निश्चितच फायदा होईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी दिलेला बिनशर्त पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले.
ही तर सपशेल शरणागती : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे राज्य उपाध्यक्ष ॲड धनंजय शिंदे म्हणाले, देशातील तरुणांच्या भवितव्यासाठी भाजपा ला 'बिनशर्त पाठिंबा' देण्याची राज ठाकरे यांची भूमिका ही अत्यंत कमकुवत आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. गेल्या 10 वर्षांत 20 कोटी नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात 10 वर्षांत 10 लाखांपेक्षा कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे हक्काचे रोजगार महाराष्ट्र द्रोही भाजपामुळे परराज्यात नेण्याच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही, असं शिंदे म्हणाले. तर बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मोदी सपशेल नापास झाले आहेत. तरुणांना रचनात्मक काम देण्याऐवजी तरुणांची माथी भडकवून तरुणांमध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक, जातीय द्वेष पसरवण्याची कामे भाजपा आणि संलग्न संस्थांच्या नेत्यांकडून झाली आहेत. अशा परिस्थितीत शब्दांचा खेळ करत भलत्याच कारणासाठी 'बिनशर्त पाठिंबा' देण्याची भूमिका असू शकते, असं शिंदे याचं म्हणणं आहे.
राज ठाकरे यांची बाजू सत्याची नाही : राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कीर्ती कुमार यांचं म्हणणं आहे की, गेल्या 10 वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या 5 वर्षांत 'भामोशा'ने (भाजपा, मोदी, शाह) देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचं शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतलं जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू' या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचं काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही. राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं. पण त्यातून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही.
राज यांच्या बदलत्या भूमिका कार्यकर्त्यांना संभ्रमित करणाऱ्या : राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल काही गोष्टी सांगितल्या. राज ठाकरे यांनी काल आणखीन एक नवीन भूमिका घेतली त्यांनी भारतीय जनता पक्षाला म्हणजेच पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. 2019 मध्ये ते शरद पवार आणि काँग्रेसच्या आघाडी सोबत मोदींच्या विरोधात प्रचार करत होते आणि त्यांचे महाराष्ट्रातील दौरे तेव्हा खूप गाजले होते. 'लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य खूप गाजलं होतं. आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि आता कालच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी भूमिका जाहीर केली. त्याचा अंदाज आपल्या सर्वांनाच होता. त्याप्रमाणे त्यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांचं त्या संदर्भातलं वक्तव्य मोदींनाच फक्त माझा पाठिंबा आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे अन्य नेते कार्यकर्ते यांच्यासोबत ते आहेत का? हा प्रश्न त्यांनी ठेवलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते नेमकं काय करणार हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. राज ठाकरे यांची ताकद आहे का? तर मुंबईमध्ये पाच लाखांच्या आसपास त्यांची ताकद आहे आणि महाराष्ट्रातही त्यांची ताकद चांगल्याप्रमाणे प्रमाणात आहे. मागच्या वेळेला देखील मतं घेतली होती. आता शिंदे आणि देवेंद्र यांनी स्वागत केलं आहे त्यांच्या भूमिकेचं. मात्र, त्याचबरोबर राज ठाकरे यांचे काही कार्यकर्ते आणि नेते दुरावले आहेत काहींनी राजीनामा दिल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे आता त्यांच्या पक्षात देखील मोदींच्या सोबत जायचं का नाही, असा एक संघर्ष तयार झालेला आहे. याचा फटका राज ठाकरेंना किती बसतो आणि ही कमी होणारी मतं भाजपा महायुतीला किती त्रासदायक ठरतात हे लवकरच स्पष्ट होईल असंही जोशी म्हणाले आहेत.
हेही वाचा :