मुंबई LOK SABHA ELECTION : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला देशात तसंच राज्यांमध्ये मतदान होत आहे. मात्र, अजूनही महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आदी जागांवरून अद्याप एकमत झालेलं नाही. दरम्यान, (शिवसेना) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आजच जाहीर करू, असं म्हटलं आहे.
उमेदवार आजच जाहीर व्हावा : 'राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा, शिवसेनेची राज्यात महायुती आहे. आम्हाला छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मिळाली काय आणि भाजपाला मिळाली काय?. येथे महायुतीचा उमेदवार निवडून येईल', असं मत आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप का ठरला नाही, असा प्रश्न संजय शिरसाठ यांना विचारला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार आजच जाहीर करा अशी, विनंती मी त्यांना करणार असल्याचं संजय शिरसाठ म्हणाले.
सर्वेक्षणामुळं शिंदे गटाच्या जागेवर भाजपाचा दावा : कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते करत होते. तसंच या जागेसाठी शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक अधिकारी, कार्यकर्त्यांचा विरोध मावळला आहे. दुसरीकडं भाजपानं राज्यातील शिंदे गटाच्या अनेक जागांवर दावा केला आहे. जे सर्वेक्षण समोर आलं आहे, त्यात शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. या सर्वेक्षणामुळं शिवसेना शिंदे गटाच्या काही जागांवर भाजपानं दावा केला आहे. त्यामुळं महायुतीत जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेलं नाही.
महायुतीत जागावाटपाबाबत एकमत नाही : दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय मागील आठवड्यात झाला आहे. परंतु महायुतीत जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेलं नाहीय. नाशिक आणि ठाण्याच्या जागेवर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. या जागांवर महायुतीमध्ये एकमत होत नसल्यामुळं जागा वाटपाच्या निर्णयाला विलंब होत असून, येणाऱ्या एक-दोन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असं महायुतीतील नेत्यांनी सांगितलंय.
हे वाचलंत का :
- पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचं 'संकल्प पत्र' जाहीर; 'या' दोन मोठ्या घोषणांसह अनेक आश्वासनं - BJP Manifesto
- "बारामती लोकसभेची निवडणूक विचाराची लढाई, नात्याची नाही"; सासऱ्यांच्या टीकेवर सुनेचं उत्तर - Sunetra pawar
- "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News