मुंबई : जोगेश्वरी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या बांधकाम आणि व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीने नोटीस बाजवली होती. त्यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील चौकशी सुरू आहे. आता ईडीने देखील चौकशीचा फास आवळलाय. वायकर यांची आज चौकशी होणार आहे. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असताना पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी रवींद्र वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ईडीने 7 ठिकाणी छापे टाकले : 500 कोटींच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशीसाठी आमदार रवींद्र वायकर यांना 17 जानेवारीला समन्स बजावून बोलावले होते. मात्र, त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्यांची मुदत वाढ मागितली होती. मात्र, त्यांना मुदतवाढ न देता ईडीने पुन्हा समन्स बजावून 23 जानेवारीला म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावले आहे. त्याचप्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीने 7 ठिकाणी छापे टाकले होते.
आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील चौकशी सुरू : कथित 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांनी ऑक्टोबर महिन्यात 6 तास चौकशी केली होती. त्यावेळी राजकीय हेतूने कारवाई केली जात असल्याचं रवींद्र वायकर यांनी आरोप केले होते. के पूर्व विभागाच्या अभियंता संतोष मांडवकर यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरु झाली. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबरला भारतीय दंड संविधान कलम 406, 420 आणि 120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, आसू निहलानी, प्रिथपालसिंग बिंद्रा (सध्या मयत), अरुणकुमार दुबे, राज लालचंदानी आणि इतर जणांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
हेही वाचा :
1 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज!
2 जयललिता यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता पुन्हा चर्चेत, बंगळुरू कोर्टानं कर्नाटकला 'हे' दिले आदेश
3 विनापरवानगी छाटली झाडे, पक्षांची घरटी तोडली: उच्च न्यायालयानं ताशेरे ओढत फेटाळली आरोपीची 'ही' मागणी