नवी मुंबई : अल्पवयीन तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत अनेक वर्ष प्रेमसंबंध ठेवल्यानंतर भावकीतील असल्यानं तरुणानं दुसरीकडं लग्न करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. ही घटना नवी मुंबई परिसरातील पनवेल तालुक्यातील मोरबे परिसरातील गावात घडली. याप्रकरणी मृत तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भावकीमधील चुलत भावाशी होते प्रेमसंबंध : मृत अल्पवयीन तरुणी आपल्या कुटुंबासह नवी मुंबई जवळील पनवेल तालुक्यातील एका गावात राहत होती. तिचे भावकीतीलच नात्यानं चुलत भाऊ लागणाऱ्या 21 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र तुमच्या दोघांचं नातं बहीण भावाचं आहे, असं कुटुंबीयांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितलं. तरीही अल्पवयीन तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकरासोबत लग्न करण्यावर ती ठाम होती. परंतु 29 नोव्हेंबरला तिचा प्रियकर दुसऱ्याच एका मुलीला घरी घेउन आला आणि तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं. यातून अल्पवयीन तरुणी प्रचंड निराश झाली. या तरुणीला मानसिक धक्का बसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. ती घरात कोणाशीही बोलत नव्हती असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं.
मुलगी झाली घरातून गायब : प्रियकारानं प्रेमात धोका दिल्यानं पीडित मुलगी दुःखी झाल्यानं रडू लागली. त्यानंतर ती घरातून 29 तारखेला दुपारी निघून गायब झाली. तरुणी कुठंच दिसत नसल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. यावेळी गावातील खेळाच्या मैदानात पीडित तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराला तिचा प्रियकर जबाबदार आहे असं म्हणत मुलीच्या काकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पनवेल तालुका पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :