सातारा Koyna Earthquake : कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 16 किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला 6 किलोमीटरवर होता.
कोयना धरण सुरक्षित : भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनानं दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातचं जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपानं पडझड झालेली नाही.
यंदाच्या वर्षातील पहिला भूकंप : यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे. सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 9 किलोमीटर होती. सौम्य धक्का असल्यानं तो केवळ कोयनेतच जाणवला.
मागील वर्षात भूकंपाचे सात धक्के : कोयना खोऱ्यात 2023 मध्ये भुकंपाचे 7 धक्के बसले होते. 8 जानेवारी 2023 रोजी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारी, दि. 6 मे, दि. 16 ऑगस्ट, दि. 7 सप्टेंबर, दि. 29 ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंप का होतात? : वास्तविक, पृथ्वीवर चार प्रमुख स्तर आहेत, ज्यांना आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच म्हणतात. पृथ्वीच्या खाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स फिरत राहतात, जेव्हा त्या एकमेकांवर आदळतात तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली कंपन सुरू होतात. जेव्हा या प्लेट्स त्यांच्या जागेवरून हलतात, तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात. जिथं कंपनाचा केंद्रबिंदू असतो त्या ठिकाणी भूकंपाचा सर्वाधिक परिणाम होतो. मात्र, भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास त्याचे हादरे लांबपर्यंत जाणवतात.
हे वाचलंत का :