अहमदनगर Missing Story : जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वांबोरी येथील अशोक खेले हे 2009 साली मुलगी सोनालीला पुणे येथे सोडण्यासाठी गेले होते. परत येताना ते हावडा एक्सप्रेसमध्ये बसले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यानंतर अनेक वर्ष ज्योती खेले यांनी बेपत्ता झालेल्या पतीचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतरही शोध न लागल्यानं कुटुंबाने अशोक खेले परत दिसतील याची अपेक्षा सोडून दिली होती.
उपचारा दरम्यान महाराष्ट्रीयन असल्याचं समजलं : 15 वर्षांनंतर अचानक एक चमत्कार झाला. कोलकाता येथील ईश्वर संकल्प संस्थेचे तपन प्रधान यांना उपचारा दरम्यान अशोक खेले हे महाराष्ट्रीयन असल्याचं समजलं. प्रधान यांनी श्रीरामपूर येथील मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीकृष्ण बडाख यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर मग सुरू झाला अपरिचित अशोक यांच्या कुटुंबाचा शोध.
सोशल मिडियावर दिली माहिती : मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीकृष्ण बडाख यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेवचे माजी सरपंच सचिन पवार यांच्याशी संपर्क केला. सोशल मिडियाच्या माध्यमातून कोलकाता येथील बेपत्ता व्यक्ती कोणाच्या ओळखीचा आहे का? याबाबत शोध सुरू केला. सदरील व्यक्ती ही वांबोरी येथील असल्याची माहिती समोर आली. तेव्हा बडाख यांनी खेले यांच्या कुटुंबाशी संपर्क करून खातरजमा केली. 15 वर्षांपासून बेपत्ता झालेले अशोक खेले यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
असा घडला प्रवास : एखाद्या चित्रपटातील रहस्यमयी कथेप्रमाणे मागील 15 वर्षात घडलेल्या घटनाक्रमांवरील पडदा पडला. पुण्याहून घरी निघालेल्या खेले यांना बसलेला मानसिक धक्का, त्यानंतर त्यांना झालेला स्मृतिभ्रंश, थेट पश्चिम बंगाल मध्ये पोहचणं, तेथील फुटपाथवर भीक मागत राहणं, वेडसर अवस्थेतील खेले यांना पोलिसांनी ताब्यात घेणं. तसंच खेले यांच्यावर सरकारी निवारा केंद्रात उपचार या सर्व गोष्टी समोर आल्या. मात्र 15 वर्षांपासून हरवलेला पिता सापडल्यानं सुनील खेले यांनी 3 लोकांना घेऊन थेट पश्चिम बंगाल गाठलं आणि आपल्या पित्याला घरी आणलं. नियतीनं खेळलेल्या डावात आपली स्मृती हरपलेल्या अशोक यांना कुटुंबापासून दूर राहावं लागल्यानंतर, पुन्हा आपलं कुटुंब मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय.
कुटुंबाला झाला आनंद : सिनेमाच्या सुरूवातीला झालेल्या विरहाच्या कथेचा शेवट जसा गोड होतो. त्याचप्रमाणं खेले कुटुंबात दैवाने रचलेल्या खेळाचा 15 वर्ष विरहाच्या झळा सोसलेल्या नंतर संपूर्ण कुटुंबाच्या दुःखांचा अंत होऊन सुखाचा झरा पुन्हा वाहू लागला. त्यामुळं सर्वांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.
हेही वाचा -