अमरावती Melghat khadshingi Tree : अमरावती जिल्ह्यात मेळघाट हा जंगत परिसर हजारो किलोमीटरपर्यंत पसरलाय. या जंगलात विविध प्रकारचे वृक्ष, झाडी, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक आढळून येतात. या जंगलातील अनेक वृक्ष हे औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात. मेळघाटसह मध्यप्रदेशातील जंगलात 'खडशिंगी वृक्ष' आढळतं. या वृक्षाची खासियत (Garud Tree Benefits) म्हणजे हे वृक्ष ज्याठिकाणी असतं, तिथं साप येतच नाही. यामागचं काय आहे कारण? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या स्पेशल रिपोर्टमधून...
खडशिंगीची खासियत : राखाडी रंगाचं खोड, ताठ खवले असलेली साल, विरुद्ध दिशेला असणारी पानं आणि आता उन्हाळ्यात पान गळती झाल्यावर येणारी पांढऱ्या रंगाची सुगंधित फुलं तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मीटर पेक्षा अधिक लांब असणारी खास शेंग अशी वैशिष्ट्यं असणारं आणि अतिशय दुर्मिळ खडशिंगी हे वृक्ष अमरावतीच्या मेळघाटात आढळतं. मेळघाटसह मध्यप्रदेशातील जंगलात आढळणारं हे खडशिंगी जिथं आहे, त्याठिकाणी सापाला 'नो एन्ट्री' अशी केवळ मान्यताच नाही तर वास्तविकता आहे. खडशिंगीचं झाड ज्याठिकाणी आहे किंवा ज्याच्या घरात खडशिंगीची ही खास शेंग आहे, त्याठिकाणी साप हा येतच नाही. वृक्षाचं आणि या वृक्षाच्या सापासारखा आकार असणाऱ्या शेंगेचं हे खास वैशिष्ट्य आहे.
गरुड वनस्पती म्हणून ओळख : महाराष्ट्रात खडशिंगी नावानं ओळखलं जाणारं हे विशेष वृक्ष मध्यप्रदेशात गरुड वनस्पती म्हणूनही परिचित आहे. गरुड हा पक्षी सापाचं भक्षण करतो. गरुड पक्षाला साप घाबरतो. खडशिंगी वृक्ष तसंच त्याच्या खास सपासारख्या आकाराच्या असलेल्या शेंगेमुळं या वृक्षाच्या परिसरात साप येत नाही. यामुळंच खडशिंगी हे सापाचा शत्रू असणाऱ्या गरुडाचं वृक्ष आहे, अशी मान्यता आहे. यामुळंच या झाडाला गरुड वृक्ष असंही म्हटलं जात असल्याची माहिती वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक श्रीनाथ वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिलीय.
खडशिंगीमध्ये औषधी गुणधर्म : खरंतर खडशिंगी या वनस्पतीच्या साध्या वासानं साप गार पडतो, तसंच अनेकदा त्याचा मृत्यू देखील होतो. यामुळं या वृक्षाच्या परिसरात साप येत नाही. तसंच जर कोणाला साप चावला तर सापाचं विष उतरवण्यासाठीही खडशिंगी वनस्पती गुणकारी आहे. सर्दी आणि पोट दुखीसारख्या आजारावर देखील ही खडशिंगी हे एक गुणकारी औषध असल्याचं वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक श्रीनाथ वानखडे यांनी सांगितलंय.
कुठे आढळतात हे वृक्ष : मेळघाटात घनताट जंगलांमध्ये हे खडशिंगीचे वृक्ष आढळतात. अमरावतीच्या तारुबांदा येथील जंगलासह जारीदा, राहू, राणीगाव या भागातील घनदाट जंगलातही हे दुर्मिळ वृक्ष आढळतं. चिखलदरालगत आमझरी इथं देखील खडशिंगीचे वृक्ष या भागात येणाऱ्या जाणकारांचे लक्ष वेधतो. मेळघाटसह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव जंगलात जिथं खडशिंगीच्या वृक्षाचं खोड आढळते, ते खोड आपल्या घरात जपून ठेवतात. या वृक्षाचं खोड घरात असले की घरात साप तसंच विषारी कीटक येत नाहीत. यासह नकारात्मक शक्ती देखील घरात वास करत नाहीत, अशी मान्यता आदिवासी समाजामध्ये असल्याची माहितीही श्रीनाथ वानखडे यांनी दिलीय.
हेही वाचा :