ठाणे : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, याची प्रचीती ठाण्यात आली आहे. ठाण्यातील सी. पी. गोयंका शाळेच्या इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय मेहरांश वर्तक या चिमुकल्यानं सलग दुसऱ्यांदा 'आशिया बुक ॲाफ रेकॅार्ड' हा किताब पटकवला आहे. इंटरनॅशनल पेंटींग आर्टिस्टची अचूक नावं सांगत मेहरांशनं 'आशिया बुक ॲाफ रेकॅार्ड'मध्ये आपली नोंद केली आहे. यापूर्वी 2023 साली वयाच्या चौथ्या वर्षी मेहरांशनं वाहतूक नियमांची 112 चिन्हं अचूक सांगत पहिल्यांदा 'आशिया बुक ॲाफ रेकॅार्ड'मध्ये विक्रम नोंदवला होता. मेहरांशच्या या विक्रमानं ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
चित्रं काढण्याची आणि पियानो वाजवण्याची आवड : बालपणापासूनच बुद्धीनं तल्लख असलेल्या मेहरांश वर्तकचं स्मृती कौशल्य उत्तम आहे. सगळ्या गोष्टी तो लवकर लक्षात ठेवतो. दोन वर्षाचा असताना मेहरांशला पहिलं सुवर्णपदक मिळालं होतं. मेहरांशला चित्रं काढण्याची आणि पियानो वाजवण्याची खूप आवड आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर होणाऱ्या विविध जागतिक बुद्धीजीवी स्पर्धा व खेळांमध्ये त्यानं 16 मेडल्स मिळवल्याचं मेहरांशच्या आईनं सांगितलं.
मेहरांशच्या वडिलांची प्रतिक्रिया : "पालक म्हणून मेहरांशच्या सर्व गोष्टी आम्ही दोघंही करतो. त्याला ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या आम्ही त्याला उपलब्ध करुन देतो. त्याच्यावर कशाचीही जबरदस्ती करत नाही. त्याला मोठेपणी काय बनायचं आहे? हे तोच ठरवणार आहे. उलट मेहरांश काही नवीन गोष्टी आम्हाला शिकवतो," असं मेहरांशचे वडील निखिल वर्तक यांनी सांगितलं. मेहरांशचा बाबा म्हणून मला खूप अभिमान वाटतो, भविष्यात त्याला दातांचा डॉक्टर बनण्याची त्याची इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा