अमरावती Mata Rukmini Palkhi : अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीच्या माहेरची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली आहे. 430 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात असून आज पालखीचं अमरावती शहरात भाविकांनी भव्य स्वागत केलं. ४५ दिवसांचा १८०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन पालखी १४ तारखेला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.
पालखीचं जोरदार स्वागत : कौंडण्यपूर येथून पंढरपूरला जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं स्वागत गत अनेक वर्षांपासून बियाणी चौक इथं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वतीनं भव्य स्वरुपात केलं जाते. यावर्षी यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी रुक्मिणी मातेच्या पालखीचं स्वागत केलं. काही अंतरापर्यंत बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनीही पालखी वाहिली.
भर पावसात भाविकांचा उत्साह : अमरावती शहरात सायंकाळी पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कौंडण्यपूर येथून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अमरावतीत पोहोचली. बियाणी चौक इथं सात वाजेच्या सुमारास या पालखीचं स्वागत करण्यात आलं. पाऊस कोसळत असला, तरी रुक्मिणी मातेच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मात्र भरभरुन वाहत होता.
नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलं दर्शन : बियाणी चौक इथं उभारण्यात आलेल्या विशेष मंचावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसह पालखी ठेवण्यात आली. यावेळी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षातील नेत्यांनी पालखीचं दर्शन घेतलं. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं, तसेच पूजा देखील केली.
सर्व धर्मीयांनी केलं पालखीचं स्वागत : बियाणी चौक इथून रुक्मिणी मातेची पालखी इर्विन चौक इथं पोहोचली असता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सर्व धर्मीय बांधवांनी रुक्मिणी मातेच्या पालखीचं स्वागत केलं. यावेळी रुक्मिणी मातेच्या पालखीवर फुलांचा वर्षाव करुन पालखीचं स्वागत करुन गजर करण्यात आला.
हेही वाचा