पुणे Colonel Vaibhav Kale : कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (17 मे) पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसंच बिगुल वाजवून हुतात्मा जवानास मानवंदना दिली. हुतात्मा कर्नल वैभव काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलं.
कोण होते वैभव काळे? : वैभव अनिल काळे हे भारतीय सैन्यात कर्नल पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारतीय सैन्यात असताना त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. त्यात सियाचीन ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणूनही ते कांगोमध्ये कार्यरत होते. ईशान्य भारतात त्यांनी सेवा बजावली. पठाणकोट सैन्य तळावर झालेल्या हल्ल्यावेळीही त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं.
गाझा हल्ल्यात वीरमरण : सुमारे दोन महिन्यांपूर्वीचं निवृत्त कर्नल वैभव काळे संयुक्त राष्ट्रांमध्ये सहभागी झाले होते. ते एका कर्मचाऱ्यासह यूएन फ्लॅग असलेल्या अधिकृत वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना झालेल्या हल्ल्यात ते ठार झाले. इस्रायल आणि हमास हल्ल्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. वैभव काळे यांनी जम्मू काश्मीर रायफल्स या तुकडींतर्गत विविध आघाड्यांवर सेवा दिली आहे. 22 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र नोकऱ्या सोडून त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत ‘यूएनडीएसएस’मध्ये सेवा सुरू केली. त्यांची पहिलीचं पोस्टिंग ही गाझापट्टीत रफाह इथं झाली होती. मात्र गाझामध्ये रफाह इथं जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. याबाबतची माहिती यूएन विभागाच्या माध्यमातून एक्सवर पोस्ट करत देण्यात आलीय.
हेही वाचा -