जालना Manoj Jarange on Raj Thackrey : मनोज जरांगे यांनी शासनानं सगेसोयऱ्यांबाबत तातडीनं कायदा करुन अंमलबजावणी न केल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. यावर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटीलांवर टीका केलीय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?, असा सवालही ठाकरे यांनी जरांगेंना केलाय. या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले मनोज जरांगे : राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही काय मिळवलं ते राज ठाकरेंना काय माहित? आम्ही मिळाल्याशिवाय मागे येणार आहे का? 2001 आणि 2000 चा जो कायदा आहे, तो ओबीसीसाठी आहे. त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असेल तर आधी अधिसूचना काढावी लागते. त्याशिवाय दुरुस्ती होत नाही. हे आम्हाला मिळालंय," असं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना दिलंय.
राज ठाकरे नाशिकला जाऊन आले का : राज ठाकरेंना टोला लगावताना मनोज जरांगे म्हणाले की, "राज ठाकरे मराठ्यांच्या बाजूनं बोलत होते. ते आमच्या विरोधात कधीपासून बोलायला लागले? ते नाशिकला जाऊन आले का? असा टोलाही मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लगावलाय. मी राज ठाकरेंना कायदा सांगावा म्हणजे अवघड झालं. राज ठाकरे आमच्या बाबतीत असं बोलत असतील हे आम्हाला पटत नाही. तुम्हाला जर उलट-सुटल बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं बघा. तुम्ही कोणाची सुपारी घेता का ते तुम्ही बघा," असाही टोला मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लगावलाय.
काय म्हणाले राज ठाकरे : आज सकाळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांना त्या दिवशी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर्वांसमोर सांगितलं होतं की, असं होणार नाही. हा तांत्रिक विषय आहे. हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही राज्याचं सरकार घेऊ शकत नाही. केंद्राला करायचं असेल, तर प्रत्येक राज्यात अशी परिस्थिती आहे. मग प्रत्येक राज्यात हे कसं करणार? त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागेल. अनेक प्रक्रिया आहेत. ही गोष्ट इतकी सोपी नाही," असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :