मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्र सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री माहिती घेणार असल्याचं कळतंय.
राज्य सरकारचे आरक्षणासाठी प्रयत्न सुरू : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लढाई आता तीव्र झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मोर्चा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. हा मोर्चा 26 तारखेला मुंबईत धडकणार आहे. मात्र, तत्पूर्वी मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे.
मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणार : मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 तसंच 22 जानेवारी रोजी प्रशिक्षकांचं प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुका पातळीवर सर्वेक्षण केलं जाणार असून सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण होईल, असा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं या सर्वेक्षणानंतर अहवाल सरकारकडं सादर केला जाईल. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक : मराठा आरक्षणासंदर्भात एकूण आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वेक्षण अहवालासह इतर बाबींबाबत चर्चा केली जाणार आहे. तसंच मुंबईत येणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांमुळं निर्माण होणारी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्याशीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात येत आहे. जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
आता सरकारशी चर्चा नाही : मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. कारण चर्चेची वेळ निघून गेली आहे. आता मराठा आरक्षणाशिवाय कोणतेही चर्चा होणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
हे वाचलंत का :