जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजानं ताकद दाखवावी, असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचं ठरवलं असून त्यासाठी राज्यभरातील मराठा समाजानं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं आव्हान निर्माण झालं आहे.
मनोज जरांगे करणार 25 जानेवारीपासून आमरण उपोषण : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून मराठा बांधवांनी उपोषणाला यावं, असं आवाहन केलं. "आता मागे हटणार नाही, मराठा समाजानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवावी. आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. या आंदोलनात सरकारला भयंकर आंदोलन बघावं लागणार आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी उद्यापासून बैठकीला सुरुवात करावी, मराठा मोठा आहे, हे सिद्ध करा, उद्यापासून मराठा समाजानं आंदोलनाची तयारी सुरू करावी," असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
नोंदी शोधण्याचं काम बंद आहे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र आता सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती आज मनोज जरांगे यांनी माध्यमांना दिली. याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, की मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचं काम बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे नोंदी शोधण्याचं काम सुरू करा, मराठा बांधवावरील गुन्हे मागे घ्या, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :