नागपूर : SIT investigation of Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता वाढली आहे. आंदोलना दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची खरंच गरज आहे का? असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय. ते नागपूर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
अध्यक्षांनी एसआयटीचे आदेश दिलेत : " मनोज जरांगे पाटील उपोषणावर असताना ते तावातावाने आणि आवेशाने बोलताना भावनेच्या आहारी जाऊन नको ते बोलून गेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याने त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणं स्वभाविक आहे. योगायोगाने सध्या अधिवेशन काळात प्रकार घडल्यानं तिन्ही नेत्याचे समर्थक आमदारांनी विधिमंडळात मुद्दा उचलला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीचे आदेश दिले," असंही तायवाडे म्हणाले आहेत.
हा तर अभ्यासाचा विषय आहे : "आंदोलक भावनिक होऊन असे वक्तव्यं करत असतील तर ते निंदनीय आहे. मात्र,एसआयटी बसवून चौकशी करायची खरचं गरज होती का? हा अभ्यासाचा विषय आहे," असंही बबनराव तायवाडे म्हणाले आहेत. "एसआयटी चौकशीचं मी समर्थन करणार नाही. तसेच मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा समर्थन करणार नाही."
एसआयटी चौकशीकडे आमचे लक्ष : "मनोज जरांगे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, बंदुकीतून निघालेली गोळी परत येत नाही. त्याप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नाही. एसआयटी चौकशीतून काय बाहेर येते? हे पाहावं लागेल. याकडं आम्हीदेखील लक्ष ठेणार आहोत. काही लोकांनी जरांगेवर केलेल्या आरोपात तथ्य नसेल. ते आरोप बिनबुडाचे असतील तर तर एसआयटी किंवा अन्य कोणत्याही एजन्सी मार्फत चौकशी झाली तरीही काही होणार नाही. संपूर्ण आंदोलन हे कोणाच्या सांगण्यावरून झालं असेल तर सत्य चौकशीतून बाहेर येईलच, " असंही ते म्हणाले आहे.
पश्चाताप झाला म्हणूण दिलगिरी व्यक्त केली : "स्वच्छ मनानं आणि स्वच्छ भूमिकेनं आंदोलन झाले असेल. कोणाचाही हस्तक्षेप नसेल तर सरकारला त्यातून काहीच निष्पन्न होणारं नाही. जरांगे पाटलांनी भावनेच्या आहारी जाऊन केलेल्या वक्तव्याचा त्यांना पश्चाताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असावी," असंदेखील बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 मुंडे, महाजन, मुनगंटीवार लढणार नाहीत लोकसभा निवडणूक, 'हे' आहे मुख्य कारण
3 लोकसभेच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांचं मोठ वक्तव्य; म्हणाले,...