मुंबई Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एक दिवसाची मुदत दिली आहे. शासकीय शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दिलाय. त्यानंतर मनोज जरांगे यांनी याबाबत सविस्तर मराठा तरुणांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सगेसोयरे प्रश्नावर सरकारला कानपिचक्या दिल्या. सरकारनं आज रात्रीपर्यंत 'सगेसोयरे' याबाबतचा मागणीचा जीआर तयार करावा, अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाकडं निघेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. मात्र, आरक्षण मिळो अथवा न मिळो आम्ही आझाद मैदानात जाणारच, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली.
सरकार अध्यादेश काढणार : यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सामान्य प्रशासन सचिव सुमंत भांगे यांनी दिलेल्या निर्णयाचं वाचन केलं. सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह सरकार अध्यादेश काढणार आहे. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या. सामान्य प्रशासन सचिव सुमंत भांगे यांनी ही माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आहे. एवढं सगळं झालं तरी अध्यादेश का काढला नाही? असा प्रश्न जरांगेंनी सरकारला केला. रात्रीतून काहीतरी यात बदल करा. आजची रात्र आम्ही इथंच राहतो, आम्ही 26 जानेवारीचा सन्मान करतो. आज आम्ही मुंबईला जाणार नाही. इथंच मुक्काम करतो, मात्र अद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढा, अन्यथा आजाद मैदानात जाऊ, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : 'आम्ही इथं न्यायासाठी आलो आहोत. तुमचे मुलं उन्हात उभे आहेत. जर त्यांना पाण्याची गरज असेल, तर त्याला पाणी द्यावं', अशी विनंती मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकरांना केलीय. मराठ्यांच्या मुलांना मुंबईत आधार द्या. गरिबांच्या मराठ्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईत येईल. आम्ही न्यायासाठी आलो आहोत. मराठे मुंबईकरांना त्रास देण्यासाठी आले नाहीत. आम्ही न्याय मागायला मुंबईत आलो आहोत. आम्हाला मोफत शिक्षण, नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्याचा निर्णय सरकारनं घ्यावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
आरक्षण मिळाल्याशिवाय परत जाणार नाही : 'जेव्हा अध्यादेश येईल तेव्हा, तो वाचूनच निर्णय घेतला जाईल. त्यापूर्वी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शनिवारी आझाद मैदानावर सर्वांनी बसून निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत परत जायचं नाही', असं मनोज जरांगे म्हणाले. 'आता आझाद मैदानात कोणीही जाऊ नये. आज इथेच थांबा. आराम करा, मी वकिलांशी चर्चा करतो', असं देखील जरांगे यांनी म्हटलंय.
54 लाख नोंदी सापडल्या : महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. राहिल्यास माझ्याकडे या. मी पुन्हा ताकदीनं आंदोलन उभा करणार. पण एकही मराठा वंचित राहणार नाही. 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याचा डेटा आम्हाला आवश्यक आहे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीय.
हे वाचलंत का :