जालना Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं आज सकाळी मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळं अंतरवाली सराटीततील मराठा आंदोलकांची चिंता वाढली होती. तसंच त्यांची अवस्था बघून याठिकाणी असणाऱ्या अनेक महिलांनी रडारड सुरू केली होती. तसंच उपोषणस्थळी मराठा बांधवांनी गर्दी केली होती.
उपस्थितांच्या विनंतीनंतर उपचार घेण्यास राजी : आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची कालपासून प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांचं एक पथक आंदोलनस्थळी दाखल झालं होतं. यात छत्रपती संभाजीनगरात जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगेंनी डॉक्टरांना माघारी पाठवलं होतं. अखेर मराठा समाजाच्या विनंतीनंतर तसंच नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार झाले आहेत. त्यानंतर जरांगे पाटलांना डाॅक्टरांनी सलाईन लावून उपचार सुरू केले. मात्र, यावेळी जरांगे पाटलांना अश्रु अनावर झाले होते.
डॉक्टरांच्या पथकाचं जरांगेंच्या प्रकृतींवर लक्ष : डॉक्टरांच्या पथकानं जरांगेंवर तातडीनं उपचार सुरू केले. त्यांना सलाईन लावण्यात आलय. तसंच त्यांना व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन देण्यात आलं होतं. मनोज जरांगेंचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही डॉक्टरांनी तपासलीय. पुढील काही काळ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून राहणार आहे.
जरांगेंच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदची हाक : मराठा क्रांती मोर्चाकडून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यानंतर राज्यातील काही ठिकाणी उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. तर काही भागात बंदला प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा :