मुंबई Manoj Jarange Patil On Prasad Lad : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन कथित आक्षेपार्ह विधान केलंय. त्यांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं पहायला मिळतंय. भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या विधानावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. तसंच मनोज जरांगे पाटील तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींचा बुरखा फाडा, असं आव्हानही त्यांनी केलं होतं. यावरून आता मनोज जरांगे पाटलांनी लाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर : यासंदर्भात बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी, ''आम्ही प्रश्न विचारणार मग तुम्ही कशासाठी आहात? राहुल गांधींना आरक्षणाबाबत प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहोत का? हे देवेंद्र फडणवीस यांना वाचवणारे लोक आहेत", अशी टीका लाड यांच्यावर केली आहे.
प्रसाद लाड काय म्हणाले होते? : प्रसाद लाड यांनी एका व्हिडिओ पोस्टद्वारे मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. "मनोज जरांगे पाटलांनी हिंमत असेल तर दोन तासांमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बुरखा फाडावा. त्यांनी जर असं केलं तर आम्ही तुम्हाला खरे मराठा आंदोलक आणि मराठ्यांचे खरे नेते समजू. जर असं झालं नाही तर तुमचे बेगडी मराठा प्रेम तसंच मराठ्यांना फसवण्याचे उद्दिष्ट जनतेपुढं उघड होईल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधी भूमिका घेऊन त्यांचा बुरखा फाडावाच लागणार आहे," असाही हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला होता.
आरक्षणासंदर्भात काय म्हणाले होते राहुल गांधी : कॉंग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेत जॉर्ज टाऊन विद्यापीठात बोलत असताना म्हणाले की, "भारतात जेव्हा योग्य परिस्थिती निर्माण होईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याबाबत विचार करेल. मात्र, सध्या ही स्थिती नाही." राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय.
हेही वाचा -
- "...हा राऊत नाही तर फडणवीसांचा डाव", नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? - Manoj Jarange On Rajendra Raut
- "मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange
- देवेंद्र फडणवीसांशिवाय सरकारचं पान हलत नाही - मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil