जालना Manoj Jarange Patil On Rajendra Raut : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली होती तसंच त्यांना खुलं आव्हानही दिलं होतं. त्यालाच आता जरांगेंनी उत्तर दिलंय.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतना जरांगे पाटील म्हणाले की,"आमदार राऊत यांनी मराठ्यांचे तुकडे-तुकडे करण्याची भाषा करू नये. राऊतांनी मला छेडून चूक केलीय. आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नयेत. देवेंद्र फडणवीसांनी एक नवा डाव टाकला असून सगळी कोलीत त्यांच्यात हातात आहेत. मी उगाच कोणाला बोलत नाही. फितुरीचं बळ देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना दिलंय. हा सर्व डाव देवेंद्र फडणवीसांनी रचलाय. त्यामुळं आमदार राजेंद्र राऊतांना दोष देऊन उपयोग नाही."
काय म्हणाले होते राजेंद्र राऊत? : "महाविकास आघाडीकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी लिहून दिलं नाही तर मी राजकीय संन्यास येईल," अशा शब्दात राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांना आव्हान दिलं. तसंच "आमचं घराणं हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे. मी जर मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौकात मी फाशी घेईन, प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल," असंही ते म्हणाले होते.
राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक : राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध करण्यात आला. राऊत यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जिथं दिसेल तिथं त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असा इशारा यादरम्यान देण्यात आला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आमदार राऊत बोलत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
हेही वाचा -