मुंबई - महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी झालीय. मात्र जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडी आणि महायुतीत एकवाक्यता होताना दिसत नाही. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केलीय. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. यावर आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
मनोज जरांगेंचा बचावात्मक पवित्रा - दरेकर : मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी आधी अंदाज घेऊन निर्णय घेऊ, अशा प्रकारची भूमिका म्हणजेच कोणाला तरी त्यांना भविष्यात मदत करायचीय, असं दिसतंय. त्यामुळे ते बचावात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होतंय. मराठा समाजाचे उमेदवार उभे करून इतर उमेदवारांना पाडण्याची ते भूमिका घेतील, त्यावेळीच त्यांचा उद्देश जनतेसमोर येणार आहे. परंतु निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याची त्यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. निवडणुकीत एखाद्या पक्षाची तळी मनोज जरांगे पाटील यांनी उचलावी, असं मराठा समाजाला वाटत नसल्याचं दिसत आहे. मराठा समाजाचे हित साधायचे की, स्वतःचे नेतृत्व पुढे आणायचे हे लवकरच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजासाठी भरभरून दिलंय. लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं, आता चित्र बदललं असून, मराठा समाज भाजपाच्या मागे उभा राहिलाय. वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोललं जातं, त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांनी मराठा समाजाचे काय वाईट केलंय, महायुती सरकारने मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत. समाज महायुतीच्या मागे उभा राहील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केलाय.
जरांगेंची राजकीय भूमिका स्पष्ट नाही - ज्योती मेटे : मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणुकीच्या घोषणेमुळे तुम्ही त्यांना आता मदत करणार का? त्यावर शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. राजकीय भूमिका स्पष्ट झाली की, आमची भूमिका स्पष्ट करू. जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांच्या घटक पक्षातील जागावाटप मार्गी लागल्यानंतर आम्ही चर्चा करू, असंही ज्योती मेटे म्हणाल्यात. विशेष म्हणजे रविवारी ज्योती विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल आणि बाळासाहेब खोसे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय, यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
जरांगेंनी निवडणूक लढवावी - संभाजीराजे: मराठा समाजाचे विषय मार्गी लावायचे असल्यास विधानसभेत आमदार पाठविणे गरजेचे आहे, तरच विषय मार्गी लागतील. मनोज जरांगे पाटील यांना पहिल्या दिवसापासून आवाहन आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे, त्यामुळे परिवर्तन महाशक्तीची ताकद आपोआपच वाढेल. मनोज जरांगे पाटील यांनी पाडापाडीची भाषा बोलण्यापेक्षा आपण जर उमेदवार उभा करू शकलो, तर खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देता येईल, त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे, आमच्या सोबत काही कारणास्तव जमत नसेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलीय.
विधानसभा निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार- मिटकरी: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी उमेदवार दिल्यानंतर नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे सांगण्याइतपत आपण मोठे नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्यांनी निवडणूक आखाड्यात उतरावं, असं आव्हानदेखील त्यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय.
हेही वाचा