जालना - Manoj Jarange Patil : "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही किंवा कोणाला पाडाही म्हटलो नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाम राहणार आहोत. कोणाला पाडायचं तेही थेट सांगणार आहोत. मराठ्यांची खरी किंमत या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आली. मराठा आरक्षण मिळावं यासाठी आम्ही संघर्षाला तयार आहोत," असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मंगळवारी जून रोजी देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये बऱ्याच दिग्गज नेत्यांना सत्तेवरून काढता पाया घ्यावा लागला आहे. या संदर्भात बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही जाहीररित्या कोणालाही पाडा म्हटलेलंच नाही. आम्ही तसं म्हटलो असतो तर माझी किंवा समाजाची प्रतिष्ठा पणाला लागली असती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कोणाला पाडायचं हे सांगण्यासाठी भूमिका घेणार आहेत", असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांच्या शक्तीचं मतात परिवर्तन- "माझ्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नव्हती. विश्वासात घेतलं जात नव्हतं. मात्र, माझ्या गरीब मराठ्यांना या निवडणुकीत किंमत आली. मराठ्यांच्या एकजुटीची ताकद यावेळी दिसली. आम्हीदेखील ताकद दाखवू शकतो, हे सिद्ध केलं. मराठ्यांच्या शक्तीचं मतात परिवर्तन होत नाही, असं म्हटलं जात होतं. पण ते झालं, असंही जरांगे पाटील म्हणाले.
विश्वासात न घेणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगे पुढं म्हणाले की, "निवडून कोणीही येऊ द्या. आम्हाला त्याची काही देणंघेणे नाही. पण या सत्ताधाऱ्यांना या मराठ्यांनी खाली खेचलं आहे, हे मात्र निश्चित. महाविकास आघाडी निवडून येऊ द्या की, महायुती आघाडी निवडून येऊ द्या. आम्ही राजकारण करणार नाही. करतही नाही. हा फक्त मी एवढं म्हटलं होतं की आपल्याला विश्वासात न घेणाऱ्यांना पाडा. पण कोणाला पाडा आणि कुठे पाडा हे मात्र म्हटले नव्हतं. कारण आम्हा गोरगरीब मराठ्यांचं भवितव्य या राजकारण्यांनी सर्व धुळीत मिळवलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी हे मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे."
अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार- "माझा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लोकसभेचा नसून राज्याचा आहे. त्यामुळे मी लोकसभा मुद्द्यावर बोलणार नसून आता येत्या काही दिवसात मी आरक्षण मिळवून दाखवणारच", असा ठाम विश्वास जरांगेनीं बोलून दाखवला. येत्या 8 जून रोजी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणारच आहे, असा ठाम निर्णय त्यांनी सांगितला. काही दिवसापूर्वी काही गावकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंतरवाली सराटी येथे मनोज जणांची पाटील यांनी उपोषण करू नये, अशी मागणी केली होती. गावात द्वेष पसरविल्याचं म्हणण चुकीचं असल्याचं जरांगे म्हणाले. "काही गावकरी मला गाव सोडून जाऊ देत नाही. त्यामुळे मी अंतरवाली सराटी येथेच उपोषणाला बसणार आहे," असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -