अमरावती Mango Tree With the Beard : निसर्गाचे अनेक चमत्कार किंवा वैशिष्ट्य ही सातत्यानं पाहायला मिळतात. असाच एक चमत्कार अमरावतीच्या मेळघाटाच्या जंगलात पाहायला मिळतो. या जंगलात चक्क भली मोठी दाढी असणारी आंब्याची झाडं चिखलदरालगत आमझरी परिसरात आढळतात. आंब्याच्या भल्या मोठ्या झाडाला फुटलेली पांढरी शुभ्र दाढी हे या झाडाकडं पाहणाऱ्यांना आगळावेगळा धक्का देणारंच आश्चर्य आहे. मेळघाटात आदिवासी बांधव या झाडाला दाढीवाला आंबा असं म्हणतात. या आंब्याच्या झाडाला ही दाढी नेमकी कशी आली, याबाबत 'ईटीव्ही भारत'नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा कुठलाच चमत्कार नव्हे तर ही निसर्गाची आगळीवेगळी किमया असल्याचं अमरावतीच्या नरसम्मा हिरय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ सचिन तिप्पट यांनी स्पष्ट केलंय.
काय आहे झाडाचं वैशिष्ट्य : चिखलदरा लगत आमझरी परिसरात पहाडाच्या उतारावर असणारं हे आंब्याचं झाड आहे. उंच अशा या झाडाच्या फांद्यांवर पांढरी शुभ्र दाढी आल्याचं दिसतं. जवळपास सर्वच फांद्यांवर असणारा पांढऱ्या दाढीचा गुच्छा खाली लोंबकाळतो. आंब्याच्या हिरव्यागार पानांमध्ये झाडाला फुटलेली ही पांढरीशुभ्र दाढी सहज नजरेत भरणारी आहे. माणसाप्रमाणं हे झाड म्हातारं झालं असून या झाडाला एखाद्या आजोबाप्रमाणे पांढरी दाढी आली असावी, असा भास हे झाड पाहणाऱ्यांना होतो.
दिवाळीनंतर बदलतो दाढीचा रंग : मेळघाटातील आमझरी सारख्या उंचावर असणाऱ्या प्रदेशात पावसाळ्यामध्ये आद्रता वाढते. यामुळं वातावरणात ओलावा खूप जास्त होतो. वातावरणातील बाष्प या भागातील उंचावरील झाडं शोषून घेतात. त्याच्यामुळं या झाडातील सालींमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं. वातावरणातील धूळ देखील या झाडांवर जमा होते. अशावेळी ज्या काही वनस्पती या दुसऱ्या झाडांवर आश्रयासाठी अवलंबून असतात, अशा वनस्पती या झाडांवर वाढतात. मेळघाटात आढळणाऱ्या व्हेंडा नावाचं ऑर्किड अशा झाडांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यासोबतच काही वर्षापासून काही गवती वनस्पती देखील अशा मोठ्या झाडांवर आश्रय घेत असून (parasite) असं हे गवत मोठ्या प्रमाणात या आंब्याच्या झाडावर देखील वाढल्याचं प्रा. डॉ सचिन तिप्पट यांनी सांगितलंय. दिवाळीपर्यंत या झाडांवरील गवत हिरवंगार दिसतं. मात्र, दिवाळीनंतर ते सुकायला लागल्यामुळं त्यांचा रंग पांढरा होतो आणि जणू आंब्याच्या झाडाला दाढी फुटली असा भास होतो, असं देखील प्रा. डॉ सचिन तिप्पट यांनी स्पष्ट केलंय.
या कारणांमुळं झाडाला दाढी : दाट झाडांच्या प्रदेशात झाडावर उगवणारं गवत हे जर पावसाळ्यात जमिनीवर उगवलं तर दाट झाडांच्या सावलीमुळं त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळं या गवती वनस्पतींनी स्वतःचं एक अनुकूल वातावरण निर्माण केलं असून, त्यांच्या बिया पाणी धरुन ठेवलेल्या झाडाच्या सालींमध्ये अडकत असल्यामुळं या वनस्पतींनी स्वतःचा विकास हा या झाडांच्या सालीवरच केल्याचं प्रा. डॉ. सचिन तिप्पट यांनी सांगितलंय. तसंच मेळघाटातील उंचावर असणाऱ्या अशा आंब्याच्या झाडांवर व्हँडा या ऑर्कीडप्रमाणे आता गवती वनस्पती देखील आश्रयाला आल्या आहेत. या वनस्पतींमुळं खरंतर आंब्याच्या झाडाचं सौंदर्य खराब दिसत असलं तरी आंब्याला फुटलेल्या ह्या दाढीमुळं आंब्याच्या झाडांचं कुठलंही नुकसान होत नाही, असं प्रा. डॉ. सचिन तिप्पट यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :