ठाणे : अनैतिक संबंधातून प्रेयसीनं 9 साथीदारांशी संगनमत करुन प्रियकराची भर मैदानात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 सी ब्लॉक येथील सेंच्युरी कंपनीच्या मैदानावर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मृत प्रियकराच्या भावानं तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ममता सिंग उर्फ बबली असं पोलिसांनी अटक केलेल्या प्रेयसीचं नाव आहे. पोलिसांनी तिचा साथीदार मुकेश कासुंदे यालाही अटक केली. तर या गुन्ह्यातील ८ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
टोळक्यानं भर मैदानात केला खून : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अजय पन्नालाल चौहान (40) कुटंबासह उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागात राहत होता. तर आरोपी ममता सिंग उर्फ बबली हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबधातून दोघांमध्ये वाद होऊन हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे त्याची कथित प्रेयसी ममता सिंग उर्फ बबली आणि तिचा साथीदार दत्ता कासुंदे यांनी साथीदाराशी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. त्याप्रमाणं सोमवारी रात्री साडेअकरा वाजता उल्हासनगर शहरातील सी ब्लॉक येथील सेंच्युरी कंपनीच्या मैदानात 8 ते 9 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं अजय चौहान याची निर्घृण हत्या केली. खळबळजनक बाब म्हणजे घटना घडत असताना अजय याला वाचवण्यासाठी मृतकाचा मोठा भाऊ आणि त्याची पत्नी घटनास्थळी आले. यावेळी त्यांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याचा मारेकऱ्यांनी प्रयत्न केला.
प्रेयसीसह एका मारेकऱ्याला ठोकल्या बेड्या : दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अजयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतकाचा भाऊ अरविंद पन्नालाल चौधरी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 109, 115(2), 352, 351 (3), 189(1), 189(2) 190, 191 (2), 49 मपोका 37(1), 135 सह भारतीय हत्यार कायदा 4, 25 प्रमाणे मंगळवारी पाहटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलीस पथकानं आरोपी ममता सिंग उर्फ बबली आणि मुकेश कासुदे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली. इतर 8 आरोपी यांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेऊन अटक करण्यासाठी विविध पथक रवाना करण्यात आली. इतर आरोपीही लवकरात लवकर अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र आठवड्याभरातच लागोपाठ चार हत्या झाल्या असून हत्येचं सत्र सुरु असल्यानं शहरात दहशत पसरली आहे.