पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या पंचसूत्रीबाबत टीका होताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीने बजेटवर मोठा परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "तुम्ही आम्हाला राज्य द्या, आम्ही तुम्हाला बजेट देऊ. आम्ही बजेट बघून काम करतो. खोके आम्हाला चालत नाहीत. सरकार चालवायला डोकं लागतं व ते आमच्याकडं आहे आम्ही दिलेल्या गॅरंटी तेलंगाणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण करुन दाखवल्या." पुण्यात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
मोदी मुद्द्यावर बोलत नाहीत : "राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत खूप काही गोष्टींवर चर्चा सुरू आहे. देशभरातील नेते हे राज्यात आले आहेत. पंतप्रधान तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री हे राज्यात आले आहेत. मला 53 वर्षाचा अनुभव असून, अनेक निवडणुका लढवल्या. यातील एका निवडणुकीत फक्त हरलो, पण मी कधीही असं बघितलं नाही की, एका राज्यातील निवडणुकीत एका मतदार संघात पंतप्रधान हे फिरत आहेत आणि घरोघरी जात आहेत. पंतप्रधान हे सातत्यानं काँग्रेसला शिव्या देत आहेत. ते मुद्द्यांवर बोलत नाहीत. आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही," असं म्हणत खर्गे यांनी भाजपासह मोदींवर टीका केली.
फक्त गांधी परिवारावर टीका : "मोदी हे फक्त गांधी परिवारावर टीका करत आहेत. राहुल गांधींवर मोदी टीका करत आहेत. त्यांच्यावर टीका करून काय उपयोग? राज्यात राहुल गांधी हे मुख्यमंत्री होणार नाहीत, ना ते राज्यात काम करणार आहेत. तरीही त्यांच्यावर टीका केली जात आहे. आज महागाई खूप वाढली आहे. राज्यातील उद्योग ते गुजरातमध्ये घेऊन जात आहेत. पण ते यावर काहीच बोलत नाहीत. गुजरातमधील स्टेडियमला स्वतः चं नाव दिलं. जिवंत असताना देखील स्टेडियमचं नाव बदलून स्वतः चं नाव ठेवलं," असं म्हणत खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
भाजपानं देशासाठी काहीच केलं नाही : "महाराष्ट्रात निवडणूक होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं कर्नाटकबाबत बोलत आहेत. मात्र, याच राज्यात '50 खोके एकदम ओके' म्हणत सरकार स्थापन केलं. याबाबत का ते बोलत नाहीत? ईडी, सीबीआय याची भीती दाखवून अनेकांना पक्षात घेत आहेत. देश एकत्र असताना 'बटेंगे तो कटेगे'ची घोषणा देत आहेत. देशासाठी काँग्रेसनं लढाई केली आणि यांनी काहीच केलं नाही," असंही खर्गे यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- "राहुल गांधींच्या तोंडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे..."; पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा
- पोस्टरवर मोदींच्या फोटोची गरज नाही; निवडणुकीत केवळ विजय महत्त्वाचा, भाजपा प्रवक्त्याची स्पष्टोक्ती
- VIDEO : नाशिकमध्ये राडा, खासदार सुप्रिया सुळे थेट पोलीस आयुक्तांच्या भेटीला, म्हणाल्या, "केसालाही धक्का..."