मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election Result) निकाल लागून आठवडा उलटला तरी देखील अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होताना दिसत नाहीय. राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश मिळालंय, तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झालाय. विधानसभेच्या निकालानंतर आम्ही लगेचच सरकार स्थापन करु, असं महायुतीतील नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन नाव निश्चित होत नसल्यामुळं शपथविधीला विलंब होत असल्याचं बोललं जातंय.
गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं द्यायची? आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा महायुतीची बैठक होणार होती. मात्र, नंतर बैठक रद्द करण्यात आली. आता रविवारी (1 डिसेंबर) एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.
5 डिसेंबर रोजी होणार शपथविधी? : सुरुवातीला 1 किंवा 2 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच यावेळी तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचंही सांगितलं जातंय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार असतील, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
काय म्हणाले उदय सामंत ? : याविषयी माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "शपथविधी 5 डिसेंबरला होणार की नाही, याबाबत अजूनही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. या सर्व बातम्या पेरल्या जात आहेत. तसंच कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं द्यायची? आणि कोणाला कोणती खाती मिळणार? याही बातम्या पेरल्या जात आहेत. परंतु, अजून कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही."
महायुतीत शिंदे नाराज? : दुसरीकडं महायुतीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीत समन्वय आहे. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत." मात्र, अमित शाह यांना पुष्पगुच्छ देतानाच्या फोटोत एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यामुळं यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळं ते एक-दोन दिवस साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले असल्याची माहिती, उदय सामंत यांनी दिली आहे. परंतु, मनासारखी खाती मिळत नसल्यामुळं आणि गृहमंत्री पद शिवसेनेला मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत आणि यावरुनच ते महायुतीत नाराज असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा -