मुंबई Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, कोकण आणि पुण्यात हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय. तसंच पुढील 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. नाशिक, अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पश्चिम घाटातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. अशा परिस्थितीत पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मुंबई पालिकेचं शाळांना आवाहन : भातीय हवामान खात्याद्वारे मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून व आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानं एक वाजता जाहीर केलेल्या अपडेट अलर्टनुसार, मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत यलो अलर्ट जारी : मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचा परिणाम आता मुंबईतील वाहतूक सेवेवर होताना दिसतोय. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू असून पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. दुसरीकडं सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. तसंच हवामान विभागानं मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांसाठी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी 24 तासात विक्रमी 707 मिलीमीटर पाऊस झालाय. यामुळं धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. एका रात्रीत पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीनं वाढ होऊन पाणीसाठा 75 टीएमसी झालाय. 24 तासात कोयनानगर येथे 163 मिलीमीटर, नवजा येथे 237 आणि महाबळेश्वरमध्ये 307 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
कोयना, कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका : कोयना आणि कृष्णा नढ्या दुथडी भरून वाहताय. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. आता धरणाचे दरवाजे उघडून एकूण 11 हजार 50 क्युसेक्स इतका विसर्ग होणार असल्यानं कोयना आणि कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका वाढलाय. दरम्यान, कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळं कृष्णा नदीच्या पुरामध्ये वाढ होणार आहे. सांगली शहराच्या नागरी भागात बुधवारीच पाणी शिरलं होतं. त्यामुळं लोकांचं सुरळीत स्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात झाली होती. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर सांगलीतील पुराची पातळी आणखीनच वाढणार आहे.
हेही वाचा -