मुंबई Sanjay Raut : निवडणुकीदरम्यान काही टीव्ही चॅनेल्सशी संवाद साधताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही शेअर बाजारावर काही विधानं केली होती. ज्यात त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारातील वाढीबद्दल वक्तव्य केलं होतं. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जेव्हा निकाल आले नाहीत तेव्हा बाजारात मोठी घसरण झाली आणि त्यानंतर गुंतवणूकदारांचं 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं उघड झालं. या विरोधात आता इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ सेबीकडे तक्रार करणार आहे. या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे खासदार असणार आहेत. या संदर्भात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सेबी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन : मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''तृणमूल काँग्रेस आणि आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांचं एक शिष्टमंडळ घेऊन सेबी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहेत. या शिष्टमंडळात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि इतर खासदार सहभागी होतील. राष्ट्रवादीलाही आमंत्रण आहे. त्यानंतर सर्व खासदार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला येतील. या भेटीत या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत देखील चर्चा होणार आहे."
पैशानं मतं विकत घेणं याला जनाधार म्हणत नाही : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी झाले. मात्र, हा विजय मॅनेज असल्याचा आणि निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "पैशानं मत विकत घेणं, वायकरांच्या विजयाची चोरी करणं याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शाहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधार आणि विचारधारा म्हणत नाहीत. लांडग्यान वाघाचं कातड पांघरलं तर तो वाघ होत नाही."
जिथं ठाकरे तिथं शिवसेना : "हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत. जिथं ठाकरे तिथं शिवसेना, हे शिंदे मिंधे मधून उपटले कुठून? हे जे उपटे आहेत, यांना भाजपानं आणलं. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची ही कारस्थानं आहेत. शिवसेना अशा प्रकारे फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण आहे. मोघलांनंतर सर्वात मोठं आक्रमण मोदी शाह यांनी केलं. राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही. आम्ही कोणाविषयी नकली शब्द वापरला नाही. मूळ काँग्रेसमधून असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले. पण मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे. शिंदेंचं जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांतच बंद होईल." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिंदे गटाकडून बॅनरबाजी हास्यास्पद : बुधवारी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. सध्या दोन शिवसेना अस्तित्वात असल्यानं शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे दोन्ही पक्षांची वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. वर्धापन दिनानिमित्तानं शिवसेना शिंदे गटाकडून बॅनर आणि पोस्टर लावले जात आहेत. या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, हा एक हास्यास्पद प्रकार आहे. मी त्यांचे काही ठिकाणी पोस्टर्स पाहिले. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीत काम करतेय. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेले सर्व तरुण शिवसेनेसोबत जोडले गेलेलो आहोत. तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून आम्ही भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला आहे."
सर्वांनी तुरुंगवास भोगला पण...: पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "या 58 वर्षात आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी या पक्षासाठी बलिदान दिलं. आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवलं. आता जर कोणी म्हणत असेल आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पाहावं. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना केली तेव्हा हे सर्व कुठे होते? कुठल्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे डोम कावळे जमणार आहेत उद्या."
हेही वाचा
- मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार?
- राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती?
- इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
- "उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी"; नारायण राणेंच्या विजयावरून राणे व ठाकरे गटात जुंपली