नाशिक Jan Sanman Yatra In Nashik : "माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून, त्यांचे दु:ख, गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवक-युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासन दिलं. त्यांच्या या यात्रेची सुरुवात आज (8 ऑगस्ट) नाशिकमधून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी तुमच्या पाठिशी : "33 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक उन्हाळे, पावसाळे बघितले. शेतकऱ्यांना मदतसुद्धा केली. याआधी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. ही वेळ येऊ नये, म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला. शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे. अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान-सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा आहे", असा शब्द अजित पवारांनी लाडक्या बहिणींना दिला.
हे अजितदादांचं वचन : "17 ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. कालच कॅबिनेट बैठकीनंतर 6 हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलो आहे. हा चुनावी जुमला नाही. तुम्ही साथ द्या. ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हे अजित पवारांचं वचन आहे", असं अजित पवार यांनी म्हटलं.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : अजित पवार पुढे बोलले की, "हे राज्य सरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा? असा सवाल करत सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय. वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा. काळजी करू नका. हे सरकार तुमच्या पाठीशी आहे."
कांद्यानं केला वांधा : "कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. त्या कांद्यानं पार वांधे केले आहेत. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवा, असंही केंद्र सरकारला सांगितलं आहे", असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. "येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय-माऊलींची आहे. या निवडणुकीत त्यांचे काम महत्त्वाचे आहे. आपला मुलगा, आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू", असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिलं.
आमची सत्तेत पकड आहे : "आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. आम्ही सत्तेत सहभागी झालो; कारण त्यातून लोकोपयोगी विकासकामे करता येतात. आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो; पण आज सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी 'लाडकी बहीण योजना' आणू शकलो. शेतकऱ्यांची वीज माफी केली. मोफत तीन सिलेंडर देत आहोत. हे मी सत्तेत आहे म्हणून करू शकलो. आमची प्रशासनावर पकड असल्यामुळे आम्ही काम करू शकत आहोत", असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.
- काळारामाचे घेतले दर्शन : जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजा करत दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा:
- "...तर मी त्यावेळी पूर्ण पक्षच सोबत घेवून आलो असतो"; अजित पवारांचं शिंदे-फडणवीसांसमोर मोठं विधान - Ajit Pawar On Eknath Shinde
- विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
- अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh