मुंबई Maharashtra Police Recruitment : एकेकाळी मुंबईत मैदानांची गर्दी पाहायला मिळत होती. मात्र मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यानं माया नगरी मुंबईत देशातील वेगवेगळ्या राज्यातून माणसांचे लोंढे येऊ लागले आणि स्थायिक होऊ लागले. परिणामी आता उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अलीकडच्या काळात सिमेंट आणि काँक्रीटच्या जंगलांची गर्दी वाढलीय. त्यामुळं मुंबईतील खेळण्याकरता असलेल्या मैदानांची संख्या दिवसेंदिवस घटली आहे. अनेक मैदानांवर सिमेंटचे ट्रॅक बांधून जॉगिंग ट्रॅक इतर सुविधा निर्माण करुन मॉडर्न रुप देण्यात आलं आहे. याचा परिणाम म्हणजे पोलीस भरतीची मैदानी चाचणी परीक्षा घेण्यासाठी मुंबई पोलिसांना सिंथेटिक मैदान मिळावं म्हणून वणवण करावी लागत आहे.
मैदान उपलब्ध नसल्यानं मैदानी चाचणी लांबणीवर : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17 हजार 471 रिक्त पदं भरण्यासाठी संपूर्ण राज्यभर बुधवारपासून मैदानी चाचणी परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईत मैदानाअभावी ही परीक्षा सुरू झालेली नाही. याबाबत बोलताना मुंबई पोलीस दलाचे प्रशासन विभागाचे सह पोलीस आयुक्त जयकुमार यांनी सांगितलं, "आम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याकरता योग्य मैदानाची उपलब्धता लवकरच करुन घेऊ. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील मैदानी चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे." मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी जवळपास 5 लाख 69 हजार अर्ज आले असून मुंबई पोलीस दलात 4 हजार 230 पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. 4 हजार 230 पदांपैकी पोलीस शिपाई पदाकरता 2 हजार 572, चालक पदासाठी 917, बँड्समन पदासाठी 24, तुरुंग शिपाई पदासाठी 717 जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रशासन विभागाचे सह पोलीस आयुक्त जयकुमार यांनी दिली.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मैदानी चाचणी होण्याची शक्यता : मुंबई पोलीस दलामध्ये सध्या 52 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असून गेल्या भरतीच्यावेळी साडेआठ हजार पदं भरण्यात आली होती. त्यापैकी पाच ते सहा हजार उमेदवारांना पोलीस प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस प्रशिक्षणाचा कालावधी हा आठ ते नऊ महिने इतका आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17 हजार 471 रिक्त पदांपैकी मुंबई पोलीस दलासाठी 4 हजार 230 पदं भरली जाणार आहेत. 19 जूनपासून मुंबई वगळता महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीसाठी देण्यात येणारी मैदानी चाचणी परीक्षा सुरू झाली. मात्र सध्या पावसाचे दिवस असून पावसामुळं मुंबई पोलिसांच्या नायगाव, मरोळ आणि कलीना येथील मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळं उमेदवारांना मैदानी चाचणी परीक्षा देणं गैरसोयीचं ठरणार आहे. तर दुसरीकडं जीआरपीच्या पोलीस भरती करता मैदानी चाचणी परीक्षा घाटकोपर येथील जीआरपीच्या मैदानावर सुरू झाली आहे. पावसामुळं सिंथेटिक पृष्ठभाग असलेलं मैदान, मैदानी चाचणी परीक्षा घेण्याकरता गरजेचं आहे. मुंबईतील अशा मैदानासाठी मुंबई पोलिसांनी प्रस्ताव दाखल केला असून येत्या काही दिवसांतच मैदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई पोलीस भरती करता मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा :