संभाजीनगर Maharashtra Hsc Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. तनिषा बोरमणीकर या विद्यार्थिनीने तब्बल 100 पैकी 100 टक्के गुण घवघवीत यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव उज्जवल केलं. विशेष म्हणजे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ खेळाडू आहे.
तनिषा बोरमणीकरनं अनेक स्पर्धांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. तिला एकूण ६०० गुणांपैकी ५८२ गुण मिळाले. खेळाचे १८ गुण मिळाल्यानं पैकीच्या पैकी गुण घेत राज्यात पहिली आली. त्यामुळे तनिषावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
आश्चर्याचा धक्का बसला: "मी एवढं मोठं यश संपादन करेल, असं मला मुळीचं वाटलं नव्हतं. मला ९८ किंवा ९८ टक्क्यांची अपेक्षा होती. ज्यावेळी मला माहिती झालं, त्यावेळीदेखील विश्वास बसत नव्हता. मी माझी गुणपत्रिका तपासली. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसल्याचं तनिषा बोरमणीकरनं सांगितलं. तिला सीए बनायचं आहे. सीएमध्ये चांगले गुण घेऊन चांगली कामगिरी करायची. भविष्यातसुद्धा क्रमांक एकवर राहण्याची इच्छा तिनं व्यक्त केली.
कसा केला अभ्यास ? तनिषानं फक्त दोन महिने अभ्यास करत यशाचे शिखर गाठलं आहे. ती म्हणाली की, "मी फक्त दोन महिने अभ्यास केला आहे. दररोज प्रश्नपत्रिका समोर ठवून त्या पूर्ण भरायचं टार्गेट होतं. नियमीत न चुकता मी तो पtर्ण करत असे. हा आनंद माझ्या आयुष्यात येईल आणि मी राज्यात पहिली येईल, असा विचारही मी केला नव्हता. वेळेचं नियोजन केलं तर यशापासून आपल्याला दूर राहू शकत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे तनिषा आहे.
तनिषा आहे बुद्धिबळ खेळाडू: तनिषा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आहे. खेळात प्रावीण्य असल्याने तिचे अधिक लक्ष बुद्धिबळाच्या स्पर्धांकडे आणि सरावकडे होतं. त्यामुळे तिने अभ्यासात कधी लक्ष दिलं नाही. तनिषानं सांगितलं, " कदाचित बुद्धिबळ खेळून मला अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली. खेळात एकाग्र होण्याची सवय लागल्यानं त्याचा मला फायदा झाला. अभ्यासातदेखील फायदा झाला. त्यामुळे कमी दिवसात अभ्यास करून चांगले गुण मिळवत आले."
तनिषाच्या कुटुंबाला आनंद : " तनिषानं आजवर यश फक्त बुद्धिबळ या खेळामध्ये अनुभवलं. मात्र ती राज्यात पहिली येईल, असा मला मुळीच वाटलं नव्हतं. खूप जास्त वेगळा आनंद आम्हाला आज होतोय. तनिषाला मुळीच अभ्यासाची आवड नव्हती. तिने कधी नियमित अभ्यास केला नव्हता. शेवटची दोन महिने तिने पाच ते सहा तास अभ्यास केला. मात्र, खेळाचा तिला मोठा फायदा झाला. कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा हा बुद्धीबळामधून तिला फायदा झाला. अभ्यासाची स्मरणशक्ती तिला बुद्धीबळ या खेळातून जास्त अनुभवायला मिळाली. त्यातून तिला फायदा मिळाला. तनिषाचा हा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही," अशी प्रतिक्रिया तनिषाच्या आईने दिली.
हेही वाचा