मुंबई August Kranti Din 2024 : राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गावदेवी येथील ऑगस्ट क्रांती मैदानात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरोघरी तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून अडीच कोटी घरावर तिरंगा फडकावण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वतंत्र्य लढ्याच्या चळवळीत 1942 मध्ये याच ऐतिहासिक अशा ऑगस्ट क्रांती मैदानातून 'चले जाव'चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यासाठी आंदोलन अतिशय वेगानं वाढलं आणि लाखो जणांनी या आंदोलनात भाग घेतला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या स्वातंत्र्यवीरांच्या देशप्रेमाची आणि शहिदांच्या बलिदानाची आठवण म्हणून या दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. नव्या पिढीसाठी हे अत्यंत प्रेरणादायी असून राष्ट्रध्वजाच्या प्रति नव्या पिढीमध्ये आत्मियता आणि निर्माण व्हावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आपण राज्य सरकारच्या वतीनं घरोघरी तिरंगा अभियान राबवत आहोत. त्याची आज सुरुवात करत आहोत. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवणार : यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्यातील अडीच कोटी घरांवर यंदाही तिरंगा फडकवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्यातील विविध आस्थापना, दुकानं तसेच प्रत्येक घरावर हा तिरंगा फडकत राहावा, राष्ट्रध्वजातील केशरी रंग पांढरा आणि हिरवा रंग हे त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचं प्रतीक आहे. त्यामुळे घरोघरी तिरंगा अभियान अतिशय उत्साहात आणि जल्लोषात राज्यभरात साजरं व्हावे, ज्यामुळे राज्यात देशभक्तीचं स्फुल्लिंग प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होईल," असंही ते म्हणाले.
गावागावात काढणार पदयात्रा : "या अभियानंतर्गत गावागावात शहराशहरात पदयात्रा, रॅली तसेच तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्यानं हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. "गेल्या दोन वर्षात आपलं राज्य ज्याप्रमाणं या अभियानात आघाडीवर आहे, त्याच पद्धतीनं यावर्षीही आघाडीवर राहील याचा विश्वास आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी हातात तिरंगा घेऊन तसेच तिरंगा सेल्फी काढून अभियानाला सुरुवात केली. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या तिरंगा अभियान स्वाक्षरी फलकावरही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली.
हेही वाचा :